कळमनुरी (जि. हिंगोली) : हिंगोली ते नांदेड या मुख्य रस्त्यावर एका खासगी शाळेजवळ असलेल्या वळणावर ट्रकने मोटारसायकलला जोराची धडक झाली. या धडकेत मोटारसायकलवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना १४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडली. मृतातील एकाचा त्या दिवशी वाढदिवस होता.
मसोड येथील सतीश संभाजी मोगले (वय २५, रा. मसोड) व अमोल प्रकाश मोगले (२३, रा. मसोड) हे दोघे कळमनुरी येथे सतीश मोगलेच्या वाढदिवसासाठी केक आणण्यासाठी आले होते. केक घेऊन ते मसोड येथे आपल्या मोटारसायकल (एमएच ३८- एए २९३१) ने मसोडकडे जात होते. हिंगोलीहून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रक (आरजे ०७ जीसी ७४३५)च्या चालकाने भरधाव ट्रक चालवून मोटारसायकलला समोरासमोर जोराची धडक दिली. या जोराच्या धडकेत मोटारसायकलवरील दोघेही गंभीर जखमी झाले होते. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक अखिल सय्यद, गुलाब जाधव, संजय राठोड, शिवाजी देमगुंडे, प्रशांत शिंदे हे घटनास्थळी आले आणि त्यांनी गंभीर जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संजयकुमार माहुरे यांनी गंभीर जखमींना तपासून मृत घोषित केले.
केक घेऊन ते आपल्या गावी परतत होतेमसोड येथील सतीश संभाजी मोगले व अमोल प्रकाश मोगले हे दोघे मोटारसायकलने कळमनुरी येथे सतीश मोगले यांचा १४ डिसेंबर रोजी वाढदिवस होता म्हणून केक आणण्यासाठी दोघे कळमनुरीला आले होते. केक घेऊन ते आपल्या गावी मसोड येथे परत जात होते. वाटेतच अपघात होईल, याची कल्पनाही त्यांना नव्हती. या गंभीर अपघातात दोघांचा मृत्यू झाला. वाढदिवसाच्या दिवशीच सतीश मोगलेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.