हिंगोली : कळमनुरी येथील चिंचाळेश्वर मंदिर ते कयाधू अमृतधारा मंदिर हिंगोलीपर्यंत काढण्यात येणाऱ्या कावड यात्रेचे कळमनुरीहून प्रस्थान झाले आहे. हजारो शिवभक्तांनी हर.. हर.. महादेव असा गजर करीत यात सहभाग घेतला आहे.
आ.संतोष बांगर यांच्या नेतृत्वात काढण्यात येत असलेल्या या कावड यात्रेची मागील सात ते आठ वर्षांची परंपरा आहे. या कावड यात्रेत हजारो भाविक व युवक मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. श्रावण महिन्यात कावड यात्रा काढण्याची जुनी परंपरा आहे. विविध भागातून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तथा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा येथील नागनाथाच्या दर्शनासाठी कावड घेऊन येणाऱ्या भाविकांची मांदियाळी पहायला मिळते. मात्र बांगर यांनी चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते कयाधू अमृतधारा मंदिर हिंगोली ही परंपरा सुरू केली अन् त्याला वाढता प्रतिसाद मिळत आहे.
कळमनुरी येथून दुपारी निघालेल्या या कावड यात्रेत कळमनुरी, हिंगोली, औंढ्यासह विविध भागातून आलेले शिवभक्त हजारोंच्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले आहेत. २० ते २२ किलोमीटरचा हा पायी प्रवास आहे. या प्रवासादरम्यान कावड घेऊन हे भाविक हर.. हर.. महादेवचा जयघोष करून आसमान निनादून टाकत असल्याचे पहायला मिळत होते. भगवे झेंडे, टी शर्ट यामुळे तर या यात्रेचे वातावरण भारावून गेले होते. हजारोंचा हा जनसमुदाय बम बम बम भोले.. भोले... च्या तालावरही थिरकत होता.
मुख्यमंत्री येणार असल्याने वेगळा जल्लोषया कावड यात्रेतील मोठ्या जनसमुदायामुळे राष्ट्रीय महामार्गाचा एक रस्ताच पूर्णपणे व्यापला होता. मुख्यमंत्री येणार असल्याने या यात्रेत वेगळा जल्लोष पहायला मिळाला. राजकीयदृष्ट्याही आ.संतोष बांगर हे मुख्यमंत्री गटात गेल्यानंतर त्यांचा हा पहिलाच मोठा कार्यक्रम होता. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.