हट्टा : येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक व उर्दू शाळेत लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी चोरून नेत परिसरातील कोवळ्या रोपांची नासधूसही केली.
गत काही दिवसांपासून परिसरातील कॅमेरे बंद आहेत. १७ सप्टेंबर रोजी शाळेत झेंडा वंदनासाठी शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी आले होते. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. गावातील अनेक शासकीय कार्यालयातील साहित्य चोरीस जात आहे. परिसरात काही महिन्यांपूर्वी वृक्षारोपण करण्यात आले आहे. मोकाट जनावरे ही लावलेली झाडे खावून टाकत आहेत. तारेचे कुंपण करणे आवश्यक असताना कोणीही याकडे लक्ष देण्यास तयार होत नाही.
या प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. बीट जमादार माणिक डुकरे, महेश अवचार यांनी भेट देऊन पाहणी केली. शाळेतील पाणीपुरवठा पाईप, शौचालय पाईप, खिडक्या आदी साहित्याची तोडफोड करून चोरीस गेल्याचे दिसून आले. यापूर्वी शाळेतील फॅन चोरीला गेला होता. त्याचाही तपास अद्याप लागला नाही. मोहिब सिद्दिकी, डी. एम. खाडे, अशोक पारटकर आदींनी ठाण्यात तक्रार दिली. माजी सरपंच नागेश खाडे, शेख सादिक, सुरेश पवार, कामराज सिद्दिकी, डी. आर. देशमुख, मारुती खाडे, मुख्याध्यापक मुंडीक, प्रताप देशपांडे, रणमाळ, लटपटे, साबेर, मुख्याध्यापक लोंढे आदी उपस्थित होते.