हिंगोली : जिल्ह्यातील ११८ आरोपींना न्यायालयाने फरार घोषित केले आहे. त्यापैकी ४ आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र, अजूनही ११४ आरोपींचा ठावठिकाणा लागत नसल्याने पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे.
जिल्ह्यातील विविध १३ पोलीस ठाणे हद्दीतील ११८ आरोपींना न्यायालयाने फरार घोषित केले आहे. या आरोपींचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने पथकांची स्थापनाही केली आहे. त्यानुसार मागील काही दिवसांत चार आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, इतर आरोपी गाव, जिल्हा सोडून तसेच वारंवार पत्ता बदलून राहत आहेत. त्यामुळे अशा आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहत आहे. नागरिकांनीही फरार आरोपींची माहिती असल्यास त्यांनी पोलिसांना सांगितल्यास अशा आरोपींचा शोध घेण्यास मदत होईल.
वसमत शहर ठाणेअंतर्गत सर्वाधिक आरोपी
जिल्ह्यात वसमत शहर पोलीस ठाणेअंतर्गत सर्वाधिक फरार आरोपी आहेत. जवळपास ५९ आरोपी फरार घोषित करण्यात आले होते. त्यापैकी ४ आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले, तर ५५ आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.
त्याखालोखाल हिंगोली शहर व बासंबा पोलीस ठाणे हद्दीतील फरार आरोपी आहेत. दोन्ही ठाणेअंतर्गत प्रत्येकी १० आरोपी फरार आहेत.
कुरुंदा, वसमत ग्रामीणमध्ये एकही आरोपी नाही
वसमत शहर त्यानंतर हिंगोली शहर व बासंबा पोलीस ठाणेअंतर्गत फरार आरोपींची संख्या जास्त आहे, तर दुसरीकडे कुरुंदा व वसमत ग्रामीण पोलीस ठाणेअंतर्गत एकही फरार आरोपी नाही.
पोलीस निरीक्षकांचा कोट..........
फरार असलेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची पथके स्थापन करण्यात आली आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. नागरिकांनीही फरार आरोपींचा सुगावा लागला तर पोलिसांना माहिती द्यावी.
-उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली