हिंगोली : डिजिटल इंडियाच्या मोहिमेस महावितरणचे वीज ग्राहक दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत. महावितरण कंपनीच्या अद्यावत तंत्रज्ञानाचा फायदा घेत नांदेड परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक गटातील एकूण ४६ हजार वीज ग्राहकांनी नोव्हेंबर महिन्यात आॅनलाईन वीज बिल भरण्याचा पर्याय स्विकारून १० कोटी ८७ लाख रूपयांचा वीजबिल भरणा केला आहे.
ग्राहकाभिमुख सेवा देण्याच्या भूमिकेतून आॅनलाईन बिलिंगचे विविध पर्याय महावितरणने उपलब्ध करून दिलेले आहेत. ग्राहकांचा वेळ व पैसा वाचविण्याच्या दृष्टीने इंटरनेट बॅकिंग, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे त्याचबरोबर मोबाईल अॅपच्या माध्यमातून वीज ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी सोपे व सुलभ असलेले पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत.
नागरी भागात याचा सर्रास वापर होताच असतो. परंतु, आता नांदेड परिमंडळांतील ग्रामीण क्षेत्रातील वीज ग्राहकही आॅनलाईन बिल भरण्यास पसंती देत असून दिवसेंदिवस आॅनलाईन वीजबिलांचा भरणा करण्याचा वापर वाढत आहे. नांदेड परिमंडळांतर्गत नांदेड, हिंगोली व परभणी या तीन जिल्ह्यांचा समावेश असून आॅनलाईन बिल भरण्यास ग्राहकांनी पसंत दिली आहे. त्या अनुषंगाने घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांनी आॅक्टोबर-२०१७ च्या तूलनेत वाढ करत नोव्हेंबर महिन्यात २९ हजार १९३ वीज ग्राहकांनी ६ कोटी ३३ लाख रूपयांचा भरणा केला आहे.
यामध्ये नांदेड शहर विभागाच्या १५ हजार ७१७ वीजग्राहकांनी ३ कोटी ५६ लाख रुपयांचा भरणा आॅनलाईन केला आहे. तर ग्रामीण विभागात ४ हजार ८५ ग्राहकांनी ६४ लाख रुपयांचा आॅनलाईन वीजबिलांचा भरणा केला आहे.त्याचबरोबर परभणी मंडळातील ९ हजार २०९ वीजग्राहकांनी ८६ लाख रूपयांचा भरणा आॅनलाईन पद्धतीने केला आहे. तसेच हिंगोली मंडळातील ७ हजार ६३५ वीजग्राहकांनी २ कोटी ३० लाख रूपयांचा आॅनलाईन भरणा केला असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.