शिरडशहापूर ( हिंगोली ) : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर - वसमत मुख्य राज्य रस्त्यावर भुसार दुकान आहे. रात्री दुकान बंद करून घरी जात असताना पाठीमागून येऊन व्यापाराच्या डोळ्यात लाल मिर्चीची चटणी टाकून त्यांच्याजवळील ३ लाख १० हजार रुपये असलेली बॅग चाेरट्याने पळविली आहे. ही घटना ५ जूनला १ वाजेच्या दरम्यान घडली आहे.
औंढा - वसमत राज्य रस्त्यावर श्री व्यंकटेश्वर ट्रेडिंग कंपनी या नावाने कोसलके यांचे आडत दुकान आहे. दिवसा ट्रकमध्ये हळद भरण्याचे काम चालू होते. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास माल भरलेला ट्रक रवाना करून दुकानावरून जयराम सूर्यतळ, व्यापारी सुभाष उत्तरवार रा. वसमत हे दोघे बस स्थानकाजवळ असलेल्या गजू मुक्तीरवार यांच्या निवासस्थानी भाड्याने असलेल्या घराकडे जात हाेते. रस्त्यात अज्ञात इसमाने सुभाष उत्तरवार यांच्या डोळ्यात लाल मिरची पावडर टाकून व्यापारा जवळील असलेली बॅग, त्यामध्ये शिरडशहापूर येथील दुकानावरील २ लाख १९ हजार रुपये तर कुरुंदा येथील दुकानावरील ८४ हजार असा एकूण ३ लाख १० हजार रुपये असलेली बॅग घेऊन चोरटे पसार झाले आहेत.
उत्तरवार यांनी आरडाओरड केला असता, घर मालक गजू मुक्किरवार हे बाहेर आले तोपर्यंत चोरटे पैसे घेऊन पसार झाले होते. या घटनेची माहिती पोलिसांना देतात सपोनि सुनील गोपीनवार, डीवायएसपी वसीम हाश्मी, तसेच जिल्हा ग्रामीण हिंगोली डीवाय एसपी वाखारे, जमादार बालाजी जोगदंड, संतोष पटवे, इम्रान सिद्दिकी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेतला. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आसून पुढील तपास सुरू आहे.