हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी साखळी उपोषणात बसलेल्या एका उपोषणार्थीला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ४ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता सिंदगी येथे घडली.
कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथे २ नोव्हेंबरपासून प्रकाश मगर हे साखळी उपोषणाला बसले होते. या साखळी उपोषणात इतर आठ ते दहा पेक्षा अधिक मराठा समाज सहभागी झाले होते. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता (सिंदगी, ता. कळमनुरी) येथे ते साखळी उपोषणासाठी आले होते. दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान त्यांना छातीत दुखू लागले. लगेच काही नागरिकांनी त्यांना पोत्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु, तेथे अधिकच त्रास होत असल्याने परत हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात भरती केले. परंतु, प्रकाश नामदेव मगर (वय ५४) यांची प्रकृती अधिकच खालावली. याचवेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा रुग्णालयातून सांगण्यात आले. आरक्षणाच्या मागणीसाठी सिंदगी येथे २६ ऑक्टोबरपासून साखळी उपोषण सुरू आहे. दहाव्या दिवशी प्रकाश मगर हे सकाळी सात वाजेदरम्यान साखळी उपोषणात सहभागी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.