हिंगोली: सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी. याकडे सरकारने काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे, अशी मागणी आ. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेतून केली. यात्रेचा नागपूर येथे समारोप होणार असून असून त्या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात येणार आहे. या सभेला काँग्रेसचे राहुल गांधी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आ. रोहित पवार यांनी पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रा सुरू केली. यात्रा सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी सेनगाव तालुक्यात दाखल झाली. यावेळी त्यांनी सेनगाव येथे पत्रकार परिषद घेऊन सेनगाव तालुक्यातील समस्या मांडून सरकारला धारेवर धरले. बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. मराठा समाजाच्या भावना दुखावणारे भाषण केल्यामुळे समाजात दुही निर्माण होत आहे. त्यामुळे अशी वक्तव्य करणे सत्ताधाऱ्यांनी टाळले पाहिजे, असे आवाहनही आ. पवार यांनी केले.
पुढे ते म्हणाले, मराठवाड्यात युवा संघर्ष यात्रा दाखल झाल्यानंतर या ठिकाणी बहुतांश समस्या आढळून आल्या आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. रोजगाराचे कुठलेही साधन उपलब्ध नाही. त्यासाठी सेनगाव तालुक्याच्या एमआयडीसी उपलब्ध करण्याची गरज आहे. त्यावर सरकारने वेळीच लक्ष दिले पाहिजे. काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे, अशी म आगणी आमदार पवार यांनी केली.