हिंगोली : पावसाचा जोर कायम राहिला तर येलदरी व सिध्देश्वर धरणातूनपूर्णा नदीपात्रात पाणी सोडावे लागेल. यातून पूर परस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे नदी काठच्या गावांना पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पुर आपत्तीबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी स्वत:चा बचाव करावा याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन केले आहे.
राज्यात तसेच जिल्ह्यात दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत असून नद्यांची पात्रे भरून वाहत आहेत. तसेच येलदरी धरण ९१.८४ टक्के तर सिध्देश्वर धरण ६६.१४ टक्के भरले असून खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी सोडल्यास येलदरी व सिध्देश्वर धरणातून पाणी सोडावे लागेल. व त्यामुळे पूर्णा नदीची पात्रे भरुन वाहू शकते. त्यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. तथापि पूर्णा नदी व जवळील नाले, ओढे काठच्या गावांना तसेच जेथे पुरस्थिती उद्भवू शकते अशा गावांसाठी उपाययोजना व खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
पुर स्थितीत घाबरून जाऊ नका, सरकारी सुचनांचे पालन करा, तात्काळ स्थानिक तहसील कार्यालयास किंवा जिल्हाधिकारी कार्यालय येथे माहिती द्यावी. यासाठी नियंत्रण कक्ष क्र.०२४५६-२२२५६० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.