हिंगोली : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. २२ जुलै रोजी सेनगाव तालुक्यात गोरेगाव -कडोळी तर कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर- पिपंरी मार्गावरील गावांचा पुरामुळे संपर्क तुटला आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील असोला शिवारात बंधारा वाहून गेला. तसेच हिंगोली तालुक्यातील साटंबा शिवारात शेततळे फुटल्याने नुकसान झाले. वसमत तालुक्यातील आसना नदीचे पाणीही शेतात शिरल्याने नुकसान झाले.
जिल्ह्यात यंदा सुमारे वीस दिवस लांबलेल्या पावसाने १८ जुलैपासून जोरदार सुरूवात केली. मागील दोन दिवसांपासून संततधार सुरू असून, शेतशिवारातील ओढे- नाले भरून वाहत आहेत. तर हिंगोली शहराजवळील कयाधू नदीचे पात्रही दुथडी भरून वाहत आहे. तसेच सततच्या पावसामुळे औंढा तालुक्यातील असोला शिवारातील बंधारा वाहून गेल्यामुळे शेतात पाणी शिरल्याने पिकांसह जमीन खरडून गेली. तर साटंबा शिवारात शेततळे फुटले. तसेच वसमत तालुक्यातील आसना नदीचे पाणीही शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या पावसाचा बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे.
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव भागात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे गोरेगाव - कडोळी मार्गावरील ओढ्याला पूर आल्याने पुलावरून दोन ते तीन फुटापर्यंत पाणी वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरील कडोही, गारखेडा, तपोवन, भगवती, माझोड, गुगुळ पिंपरी या गावचा संपर्क तुटला आहे. गोरेगाव येथील शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पुरामुळे शाळा गाठता आली नाही.तसेच कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूरनजीक पिंपरी जवळील पुलावरून दोन फुटापर्यंत पाणी वाहत असल्याने आखाडा बाळापूरशी कान्हेगाव, चिखली, पिंपरी गावचा संपर्क तुटला आहे.