हिंगोली : शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये बुधवारी अवकाळी पावसाने जोरदारपणे हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हळदीचे पुन्हा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पावसामुळे हिंगोली शहरातील सखल भागात पाणी साचले होते. दुपारी साडेचार वाजेदरम्यान अचानक पाऊस आल्यामुळे बाजारकरूंची तारांबळ उडाली.
मागच्या दहा दिवसांपासून वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस अधून-मधून हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हळदीसह इतर उन्हाळी पिकांचे नुकसान होत आहे. सकाळी उन्हात वाळायला ठेवलेली हळद पाऊस येताच काढून घ्यावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फजिती होत आहे. अवकाळी पाऊस केव्हाही हजेरी लावत आहे. त्यामुळे उन्हाळा आहे की पावसाळा? हेच कळायला मार्ग नाही.
३ मे रोजी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विवाहकार्य होते. सकाळपासून वऱ्हाडी मंडळी तयारी करत होते. परंतु दुपारी साडेचार वाजेदरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावताच वऱ्हाडी मंडळींची तारांबळ उडाली. काही ठिकाणी वादळामुळे लग्नाचा मंडपही उडून गेला. बुधवारी जिल्ह्यातील औंढा नागनाथ, खुडज, कळमनुरी, कुरुंदा, बाळापूर, वारंगाफाटा, डिग्रस (कऱ्हाळे), कौठा आदी ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
वातावरणात उकाडा वाढला...३ मे रोजी सकाळपासूनच शहरासह जिल्ह्यात ढगाळमय वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे वातावरणात उकाडा जाणवू लागला होता. दरम्यान, वीजपुरवठा अधून-मधून खंडित होत होता. दुपारी ४:३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात अधिकचा उकाडा निर्माण झाला.