कळमनुरी (हिंगोली) :-तालुक्यात २२ सप्टेंबर रोजी सकाळी तब्बल ३ तास झालेल्या दमदार पावसामुळे कयाधू नदीला पूर येऊन खरीपातील पिके पाण्याखाली सापडली आहेत. आजच्या पावसाची नोंद २२.६६ मि.मि. एवढी नोंदल्या गेली आहे.
कळमनुरी तालुक्यातील अन्य गावांसह शहर परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने पाऊस होत आहे. अशातच २२ सप्टेंबरला सकाळी अतिवृष्टी झाल्याने कयाधू नदीला मोठा पूर आला. यामुळे नदीकाठच्या शेतांमधील पिके पूर्णत: पाण्याखाली गेली आहेत. चालू वर्षात या नदीला दोन ते तीनवेळा पूर आल्यामुळे पिकांची अतोनात हानी झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दरम्यान, पुराच्या पाण्यामुळे यापुर्वी नदीकाठावरील पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आला होता. काहीच दिवसांत पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली असून सर्वेक्षण करण्याचे आदेश तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी तलाठ्यांना दिले आहेत.