हिंगोली: मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार १३ आणि १४ जून रोजी हिंगोली जिल्ह्यासह शेजारच्या परभणी व नांदेड जिल्ह्यांमध्येही जोराचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज ‘वनामकृ’ विद्यापीठाने वर्तविला आहे.
गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात सकाळी उन व दुपारच्या वेळेस ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. विशेष म्हणजे उन व ढगाळ वातावरणामुळे वातावरणात दमटपणा होत आहे. या दमट वातावरणामुळे डोके दुखणे, अंग दुखणे, अंग जड पडणे आदी आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. येत्या १३ व १४ जून रोजी हिंगोलीसह परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जोराच्या पावसादरम्यान शेतकऱ्यांनी पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहनही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने केले आहे.