हिंगोली : माझ्या पत्नी व दोन वर्षाच्या मुलीला मेव्हण्याने अपहरण करून नेले आहे. तुम्ही लवकर या, अशी डायल ११२ वर खोटी माहिती देवून पोलिसांना दिशाभूल करणाऱ्या दारूड्या पतीविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तालुक्यातील खानापूर चित्ता येथे १० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
अडचणीत सापडलेल्या नागरीकांना वेळीच मदत मिळावी, या उद्देशाने पोलिस प्रशासनाने डायल ११२ ही हेल्पलाईन सेवा नि:शुल्क उपलब्ध करून दिली आहे. अवघ्या काही मिनिटातच पोलिस घटनास्थळी पोहचत असल्याने महिला, मुली, ज्येष्ठ नागरीक, अपघातातील जखमींना दिलासा मिळाला आहे. अनेकांचे प्राणही वाचविण्यात डायल ११२ च्या पथकाला यश आले आहे. तालुक्यातील खानापूर चित्ता येथील बालाजी नागोराव चंद्रवंशी याने १० ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजता डायल ११२ वर कॉल केला.
माझी पत्नी व दोन वर्षाच्या मुलीचे मेव्हण्याने अपहरण केले आहे. तुम्ही तत्काळ घटनास्थळी या, अशी मदतही मागितली. कॉल येताच सहायक पोलिस निरीक्षक विलास चवळी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून डायल ११२ च्या पथकातील सहायक पोलिस उप निरीक्षक मदन गव्हाणे, पोलिस अंमलदार मुरलीधर जाधव, वाळले आदींना सोबत घेत ८:३९ वाजता खानापूर चित्ता गाठले. पथक तेथे पोहचले असता बालाजी चंद्रवंशी हा दारू प्यायलेल्या अवस्थेत आढळून आला. तसेच त्याने पत्नी व मुलीचे अपहरण झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी त्यास ताब्यात घेत त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिस अंमलदार मुरलीधर जाधव यांच्या फिर्यादीवरून बालाजी चंद्रवंशी याचेविरूद्ध बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. सहायक पोलिस उप निरीक्षक मदन गव्हाणे तपास करीत आहेत.
शिक्षा आणि दंड दोन्ही डायल ११२ ही तत्काळ पोलिस मदतीसाठी उपलब्ध करून दिलेली हेल्पलाईन सेवा आहे. यावर विनाकारण कॉल करून खोटी माहिती दिल्यास किमान सहा महिने कारावासाची शिक्षा व आर्थिक दंडही होऊ शकतो. त्यामुळे आवश्यक असेल तेव्हाच डायल ११२ वर कॉल करून पोलिसांची मदत मागावी.- विलास चवळी, सहायक पोलिस निरीक्षक, बासंबा