हिंगोली : भंडारा येथील सहाय्यक सरकारी कामगार अधिकारी व एका कर्मचाऱ्यास मारहाण केल्याच्या घटनेचा हिंगोलीत निषेध करण्यात आला. दोषींविरूद्ध कडक कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.
जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामार्फत सध्या राज्यभरात विविध योजने अंतर्गत कामगारांना आवश्यक साहित्य संचाचे वाटप केले जात आहे. तसेच कामगारांची नांव नोंदणी मोहीम सुरू आहे. परंतु ही प्रक्रिया राबविताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध अडचणींणा तोंड द्यावे लागत आहे. शिवाय नोंदणीसाठी आलेल्या कामगारांचीही कामे लवकर होत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. याच कारणातून अनेकदा अधिकारी, कर्मचारी व कामगार यांच्यात वाद होत आहेत. अशीच एक घटना भंडारा येथे घडली.
कामगार नांव नोंदणी प्रक्रिया राबविताना भंडारा येथील जिल्हा सरकारी कामगार अधिकारी व संबधित कर्मचारी आणि कामगार यांच्यात वाद झाला. यावेळी संतप्त कामगारांनी अधिकारी व कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना घडली. सदर घटनेचा हिंगोली जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयाकडून निषेध करण्यात आला. संबधितांविरूद्ध कारवाई करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली. यावेळी कार्यालयातील एन. एस. भिसे, सिद्धार्थ दवंडे, सुलतान मिर्झा व कर्मचारी उपस्थित होते.