हिंगोली, दि. 5 - मुंबई येथे ९ ऑगस्ट रोजी होणा-या राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून हिंगोलीत ५ ऑगस्ट रोजी दुपारी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. जिल्हाधिका-यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देवून रॅलीचा समारोप झाला.गतवर्षी नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे मराठा समाजातील भगिनीवर अत्याचार झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यात ५७ ठिकाणी मराठा क्रांती मोर्चे निघाले. प्रत्येक मोर्चात लाखोच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते. अगदी शांततेत व शिस्तीत हे मोर्चे पार पडले. मात्र सरकारने अशा त्याकडे कानाडोळा करून मराठा समाजाला केवळ आश्वासनेच दिली. यामुळे मुंबई येथे ९ ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची जनजागृती म्हणून ५ ऑगस्ट रोजी शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये तीच शिस्त आणि तोच उत्साह पहावयास मिळाला. रॅलीत सहभागी युवकांची संख्या लक्षणीय होती. शिवाय महिलाही मागे नसल्याचे दिसून आले.या रॅलीत जोरदार घोषणाबाजीही झाली. यात ये रॅली तो झॉंकी है, मुंबई अभी बाकी है, अशा घोषणा दिल्या. तर जय जिजाऊ... जय शिवराय असा जयजयकार करीत चलो मुंबईचा नारा देण्यात आला. ही रॅली सकाळी ११ वाजता हिंगोली शहरातील छत्रपती शिवरांयाच्या नियोजित पुतळयापासून सुरू झाली. त्यांनतर रिसाला बाजार, अकोला बायपास, आदर्श कॉलेज, सरस्वती नगर, रिसाला बाजार, पोष्ट ऑफीस रोड, जवाहर रोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधीध चौक, इंदिरा गांधी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय जावून धडकली. यावेळी मुंबई मोर्चाबदल मार्गदर्शन करण्यात आले. समाजातील पाच मुलींच्या वतीने जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. त्यात म्हटले की, मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्यात यावे, कोपर्डी घटनेतील आरोपीला फासावर चढवावे, तसेच शेतक-यांशी निगडित विविध मागण्याही निवेदनात आहेत. मराठा समाजांच्या भावनांचा उद्रेक होत असून उपरोक्त मागण्या तत्काळ मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा दिला. रॅलीत समाज बांधव हजारोंच्या सख्यंने सहभागी झाला होतारॅलीत महिलाही सहभागीहिंगोलीत मुंबईच्या मोर्चाच्या जनजागृतीच्या निमित्ताने निघालेल्या मोटार सायकल रॅलीत पहिल्यांदाच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. प्रामुख्याने तरुणींची लक्षणीय उपस्थिती होती. डोक्यावर फेटे बांधून वेगळ्या वेशभूषेत या महिला सहभागी होत्या.तीच शिस्त अन् तोच उत्साह़हिंगोलीत मोटारसायकल रॅली निघाली असता तीच शिस्त अन् तोच उत्साह दिसून आला. मोटारसायकलस्वार अगदी नियोजनबद्धरीत्या रॅलीत सहभागी झाले होते. ज्येष्ठ नागरिकांसह समाजातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रस्त्याने जाताना आपल्या दुचाकीचा कुणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जात होती. जिल्हा कचेरीवर पोहोचल्यानंतर सर्वांनी शिस्तीत आपल्या मोटारसायकली गेटसमोर लावल्या होत्या. त्यांनतर मोर्चाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांना दिल्यानंतर ही रॅली विर्सजित करण्यात आली.
मुंबईतील मराठा मोर्चासाठी हिंगोलीत बाईक रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 6:15 PM