हिंगोली : शहरालगतच्या खटकाळी बायपास परिसरात बोगस आयुर्वेदिक औषधी विक्री करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर औषधविक्रेत्याची आरोग्य विभागाकडून कसून चौकशी केली जात आहे.
हिंगोली शहरात मागील काही दिवसांपासून विविध बिमारींवर आयुर्वेदिक औषधोपचार करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. प्रसिद्धीपत्रक वाटप करून त्यावर विविध जुने आजारांवर उपचार केले जातील असा मजकुर छापलेला आहे. शिवाय प्रसिद्धीपत्रकावर रूग्णांना भेटण्याची तारीख व वेळ दिला जातो. असेच एक प्रकरण आता शनिवारी हिंगोली शहरालगतच्या खटकाळी परिसरात आयुर्वेदिक औषध विक्री करताना उघडकीस आले आहे. पोलिसांनी सदर इसमास ताब्यात घेततले असून रूग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या ईसमाची कसून चौकशी आरोग्य विभागाचे पथक करीत आहे. त्याच्याकडील सर्व औषधी साहित्यही जप्त केले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, डॉ. सतीश रूणवाल, डॉ. गोपाल कदम औषधी पुड्यांची तपासणी करीत आहेत.
आर्युवेदिक औषधी विक्री करणाऱ्या इसमाची कसून चौकशी केली जात आहे. त्या इसमाकडे कुठला परवाना आहे का ? औषधी बोगस आहे का ? याची तपासणी केली जात आहे. चौकशीत दोषी आढळल्यास त्या औषधी विक्रेत्यावर कडक कार्यवाही केली जाईल असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.