हिंगोली : महाराष्ट्र राज्य सराफा व सुवर्णकार फेडरेशनने पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होऊन येथील जिल्हा सराफा, सुवर्णकार असोसिएशनतर्फे आज दुकाने बंद ठेऊन निषेध करण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
अहमदनगर जिल्ह्यातील कोळपेवाडी येथील एका सराफा व्यापाऱ्याची १९ आॅगस्ट रोजी गोळ्या घालून दरोडेखोरांनी हत्या केली. तसेच सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेचा निषेध करीत हिंगोली जिल्हा सराफा व सुवर्णकार असोसिएशनतर्फे दुकाने बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला. पोलीस प्रशासनाने सराफा बाजारात शस्त्रधारी पोलीस तसेच गस्त वाढवावी. सराफा व्यावसायीकांना शस्त्र परवाना द्यावा. तसेच सराफा बाजारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
यासह विविध मागण्यांचे यावेळी निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले. बंदमध्ये सहभागी होत, हिंगोलीतील सर्व सराफा व्यापारी एकत्रित जमले होते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी सराफा व्यापारी आले असता, यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे यांनी व्यापाऱ्यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुरेशअप्पा सराफ, किशोर सोनी, विशाल सोनी यांच्यासह सराफा व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्याआहेत.
मागील अनेक वर्षांपासून शहरातील सराफा बाजारात वरील मागण्यांसाठी असोसिएशनतर्फे पाठपुरावा केला जात आहे. परंतु याकडे पोलीस प्रशासन लक्ष देण्यास तयार नसल्याचे असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुरेशअप्पा सराफ यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.