Hingoli News: आखाडा बाळापूर (हिंगोली) शहरात बुधवारी (12 मार्च) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही बाजूने मोठा जमाव रस्त्यावर उतरला आणि तुफान दगडफेक झाली. यामध्ये काहीजण जखमी झाले, तर पाच ते सहा गाड्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, जमाव हिंसक होत असल्याचे दिसताच पोलिसांनी लाठीचार्ज केला. जमावाला शांत करण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही रस्त्यावर उतरावे लागले. उत्तर रात्रीपर्यंत हा राडा सुरूच होता. पोलीस बंदोबस्त वाढवल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली, मात्र तणाव कायम आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आखाडा बाळापूर येथे मिलन चौकात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन गटात किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद वाढला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही बाजूने लोक जमले.
दोन्ही बाजूने दगडफेक
मिलन चौक ते आंबेडकर पुतळ्यापर्यंत दोन गट आमने-सामने आले. दोन्ही बाजूने तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीत काही जणाचे डोके फुटले, तर कोणाला दगड लागून मुका मार बसला.
पोलिसांकडून लाठीचार्ज
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस पथके दाखल झाली. दोन्ही बाजूच्या जमावाला शांत करताना पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. तुफान लाठीचार्ज करत पोलिसांनी जमाव पांगवला.
दोन्ही गटांकडून पुन्हा दगडफेक, एसपींना उतरावं लागलं रस्त्यावर
परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसत असतानाच काही वेळाने पुन्हा दोन्ही बाजूने जमाव रस्त्यावर आला आणि दगडफेक केली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार तातडीने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. खुद्द पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी जमाव पांगवण्यासाठी व शांतता प्रस्थापित करण्यासाठी रस्त्यावर उतरले.
पोलीस बळ वाढल्यानंतर दोन्ही बाजूंचा जमाव आक्रमकच होता. त्यामुळे त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. जुन्या बस स्थानकावर महिला व तरुणांनी रास्ता रोको करत दगडफेक करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
पोलीस ठाण्यातही रात्री उशिरापर्यंत मोठा जमाव जमला होता. आंबेडकर चौकात व पुतळ्यावर दगडफेक करणाऱ्यांना तातडीने अटक करा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना तातडीने ताब्यात घेऊ दंडीत करू, असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले.
याप्रकरणी तक्रार नोंदवून घेऊ आणि आरोपींना 48 तासाच्या आत जेरबंद करू असे आश्वासन पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी दिल्यानंतर महिला माघारी फिरल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बाळापुर व परिसरात मोठे चिंतेचे वातावरण पसरले.
पोलिसांनाही लागले दगड...
दोन्ही बाजूने तुफान दगडफेक सुरू असताना पोलीस जमावाला पांगवत होते. त्यावेळी काही पोलीस कर्मचाऱ्यांनाही दगड लागले. तर दोन्ही बाजूंच्या तरुणांना शांत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रतिष्ठित नागरिकांनाही पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद खावा लागला. राखीव पोलीस पथकालाही बोलवण्यात आले.