हिंगोली - शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवलेल्या मृतदेहाचे उंदरानं चक्क लचके तोडून मृतदेह कुरतडल्याचा प्रकार समोर आला आहे. हिंगोलीतील वसमत तालुक्यातील ही संतापजनक घटना आहे. कवठा येथील रहिवासी असलेल्या तरुणाचा गुरुवारी (1 मार्च) रात्री अपघातात मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव सुधीर खराटे असे आहे. या सुधीर खराटेचा मृतदेह शवविच्छेदनाच्या प्रक्रियेसाठी वसमत येथील शवागारात ठेवण्यात आला होता. यावेळी रात्रीच्या वेळेस उंदरानं मृतदेहाचे लचके तोडत मृतदेह अक्षरशः कुरतडला. या घटनेमुळे खराटे यांच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला. या प्रकरणाचा निषेध व्यक्त करत खराटे यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आपला तीव्र संपात व्यक्त केला.
शिवाय, जिल्हा शल्य चिकित्सक आल्याशिवाय शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी स्वीकारली होती. दरम्यान, येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी डी.वाय.एस. पी काशिद, पोलीस निरीक्षक उदय शिह चंदेल दाखल झाले होते.
डॉक्टरांच्या आश्वासनानंतर मृतदेहाचं शवविच्छेदन
उंदराने मृतदेह कुरतडल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून दोषी आढळणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे डॉ. पोहरे यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
प्रशासनाचा हलगर्जीपणा
दरम्यान, ''या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा स्पष्ट दिसत आहे. मृतदेह शवागरात फ्रिजरमध्ये सुरक्षित ठेवण्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळेच हा प्रकार घडला आहे. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी'', अशी प्रतिक्रिया संजय भोसले यांनी दिली