दयाशिल इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरालगतच्या खटकाळी बायपास येथे रेल्वे उड्डाणपूल नाही. शिवाय दर ४५ मिनिटांनी येथून रेल्वे किंवा मालगाडी धावते. त्यामुळे गेट बंद होतो. मात्र नेहमीच्या गेट बंदला नागरिक वैतागले आहेत. विशेष म्हणजे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत असून यात रुग्णवाहिकाही अडकून पडतात. परिणामी गंभीर रूग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल करताना अडचणीं येतात.हिंगोली शहरात खरच विकासात्मक कामे होत आहेत का? प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत का? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. पंरतु प्रत्यक्षात मात्र असे होताना दिसून येत नाही. त्यातलाच एक भाग म्हणजे हिंगोली शहरातील खटकाळी बायपास येथील रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना नाहकच अडकून पडावे लागत आहे. शाळकरी मुले, कामानिमित्त ये-जा करणारे कर्मचारी, पेपर विक्रेते, विशेष म्हणजे गंभीर रुग्ण घेऊन येणाºया रुग्णवाहिकाही वाहतुकीच्या कोंडीत अडकून पडतात. त्यामुळे रूग्णालयात रुग्ण दाखल करताना अडथळा निर्माण होतो.... तर गैरसोय दूर होईल
- रेल्वे येताच गेट बंद केल्यानंतर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात. वाहतूक सुरळीतसाठी ट्रॅफिक शाखेचे पोलीस कर्मचारी प्रयत्न करतात. २४ आॅक्टोबर रोजी रेल्वे येताच गेट बंद झाले. त्यात रूग्णवाहिकाही अडकून पडली. यावेळी वाहतूक शाखेचे गजानन सांगळे, वसंत चव्हाण यांच्यासह इतर पोलीस कर्मचा-यांनी वाहतूक सुरळीत केली. रूग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला. परंतु ही नेहमीचीच समस्या असल्याचे पोलीस कर्मचा-यांनी सांगितले. वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनचालकांत अनेकदा वादही होतात.
- विशेष म्हणजे रेल्वेपटरी पलीकडे एसआरपीएफ कॅम्प व पोलीस वसाहत आहे. एखादी घटना घडल्यास एसआरपीएफच्या तुकडीस घटनास्थळावर तत्काळ हजर होणे आवश्यक असते. परंतु अनेकदा अशावेळी रेल्वेगेट बंद केल्याने जवान अडकून पडतात. पोलीस कर्मचा-यांनाही वेळेत हजर होताना अडचणी येतात. त्यामुळे हिंगोली शहरातील खटकाळी बायपास येथील रेल्वे उड्डाणपुल उभारणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक, अधिकारी, डॉक्टर व कर्मचा-यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिल्या.
रेल्वे उड्डाणपुलाची उभारणी करावी, नागरिकांची मागणी
हिंगोली शहरालगतच्या खटकाळी बायपास येथे रेल्वे उड्डाणपूल नाही. त्यामुळे शाळेत मुलांना वेळेत पोहचविताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. काही शाळेतील व्हॅन मुलांना शाळेत जाण्यास उशिर होईल म्हणून चक्क शॉर्टकटचा मार्ग शोधतात. परिणामी, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, व या ठिकाणी उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी शाळचे व्हॅनचालक पांडुरंग क-हाळे यांनी केली.
हिंगोली तालुक्यातील येडूद येथून हिंगोली शहरात दूध व भाजीपाला विक्रेते मोठ्या संख्येने येतात. परंतु रेल्वेगेट बंद झाल्यानंतर अडकून पडावे लागते. एखाद्या वेळेस तर भाजीपाला विक्रेत्यांना बीटमध्ये जाण्यास उशिर होतो. त्यामुळे नाईलाजाने बेभाव शेतीमालांची विक्री करावी लागते. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल उभारणे गरजेचे असल्याचे येडूद येथील गजानन घुगे यांनी सांगितले.