हिंगोली : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तिन्ही आगारांतील बसेस बंद आहेत. यामुळे हिंगोली आगाराला सात दिवसांत जवळपास ३५ लाखांचा फटका बसला असल्याची माहिती आगार प्रमुखांच्यावतीने देण्यात आली.
फेब्रुवारी २०२१ पासून कोरोना महामारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे पाहून शासनाने १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. यावरही नागरिकांचे फिरणे बंद होत नसल्याचे पाहून शासनाने परत २५ एप्रिलपासून १ मे पर्यंत कडक संचारबंदी लागू केले. त्यानंतर पुन्हा १५ मेपर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने महामंडळास पत्र देऊन तिन्ही आगारातील बसेस बंद ठेवण्याचे आदेशित केले. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार तिन्ही आगारातील बसेस आजमितीस बंदच आहेत.
हिंगोली आगारात जवळपास ३०३ कर्मचारी आहेत. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार ठरावीक कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलविण्यात येत आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आदेश आहेत, अशानीच कामावर यावे. इतरांनी बाहेर न फिरता घरीच बसावे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत १० चालक, १० वाहक व ७ यंत्र कारागिर यांनाच कामावर बोलविण्यात येत आहे. तसे पत्र महामंडळाने कर्मचाऱ्यांना दिले आहे.
एप्रिल महिन्यामध्ये विवाहाचे ८ मुहूर्त होते. आता मे महिना सुरू झाला आहे. मे महिन्यामध्ये विवाहाचे १६ मुहूर्त आहेत. हे ही मुहूर्त कोरोनामुळे जातात की काय, असे महामंडळाला वाटू लागत आहे. एकदंरीत लागू केलेल्या संचारबंदीमुळे तिन्ही आगारातील बसेस सुरूच नाहीत. १५ मे पर्यंत संचारबंदी असल्यामुळे एसटी महामंडळाला तोटाच सहन करावा लागणार आहे.
ज्यांना आदेश आहेत त्यांनीच यावे...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ठरावीक कर्मचाऱ्यांनाच कामावर येण्याचे आदेशित केले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आदेशित केले आहे त्या कर्मचाऱ्यांनी कामावर यावे. इतर कर्मचाऱ्यांनी मात्र बाहेर न फिरता घरीच बसावे. कामावरील कर्मचाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा.
- संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, हिंगोली