हिंगोली : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन गत १४ एप्रिलपासून हिंगोली आगारातून चारच बसेस सॅनिटायझर करून सोडल्या जात आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच बोलाविले जात असल्याची माहिती स्थानकप्रमुख संजयकुमार पुंडगे यांनी दिली.
कोरोनाचे रुग्ण सर्वत्र वाढू लागल्याचे पाहून १४ एप्रिलच्या रात्रीपासून राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. रुग्ण कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे पाहून कार्यालय व इतर संस्थांमध्ये ५० टक्के उपस्थिती ठेवा, असे सांगितले आहे. शासनाने दिलेल्या सूचनांचे एस. टी. महामंडळाने पालन करीत ज्यांना ड्युटी दिली आहे असेच कर्मचारी कामावर येत आहेत. १५ एप्रिलपासून हिंगोली आगारातून नांदेड, रिसोड, वाशिम, झिरोफाटा अशा चारच बसेस सुरू आहेत. कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढू लागल्याचे पाहून चालक, वाहक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ड्युटी असेल तर कामावर या अन्यथा घरी बसा, अशा सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे सध्या तरी महामंडळात ५० टक्के उपस्थिती आहे. त्याचबरोबर प्रवासी प्रवासाला निघाले आहेत अशा प्रवाशांनीच बसस्थानकात थांबावे. सोडायला आलेल्या नातेवाईकांनी विनाकारण गर्दी न करता घरी राहणे पसंत करावे, असा सल्लाही एस. टी. महामंडळाने प्रवाशांना दिला आहे.
कोरोना महामारीचा वाढलेला प्रादुर्भाव पाहता ड्युटीवरील चालक आणि वाहकांंना मास्क घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. बसेसमध्ये बसणाऱ्या प्रवाशांना मास्क असेल तर बसमध्ये घ्यावे अन्यथा त्यांना बसमध्ये घेऊ नये, असेही निर्देशित केले आहे.
चारच मेकॅनिक येतात कामावर...
कोरोनाचे वाढते रुग्ण पाहून सर्वच मेकॅनिकला बोलविण्याऐवजी चारच मेकॅनिकला कामावर बोलाविले जात आहे. बाकीच्या मेकॅनिकने बाहेर न फिरता किंवा महामंडळात न येता घरीच बसावे, अशीही सूचना त्यांना देण्यात आली आहे. एस. टी. महामंडळाला मेकॅनिकची (यंत्र कारागिर) गरज पडल्यास त्यास कामावर बोलावून त्याची हजेरीही लावण्यात येईल.