हिंगोली : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या हळद मोंढ्यात सोमवारी (दि. २७) सकाळी ७ वाजेच्या दरम्यान वाहने गेटमध्ये सोडण्याच्या कारणावरुन सुरक्षारक्षक आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. त्यामुळे गोंधळ झाल्याने मोंढ्याचे गेट बंद केल्याने जवळपास २५० ते ३०० वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
बाजार समितीने वाहनचालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता २७ मे पासून वाहनांसाठी टोकन पद्धत सुरु केली. याची माहिती नसलेल्या अर्ध्यावर वाहनचालकांना टोकनच मिळाले नाही. सकाळी सुरक्षारक्षकाने काही टोकण नसलेल्या वाहनांना आत सोडले. तर अनेक वाहनांना गेटवरच अडवून ठेवले. काही वाहनांनी मोंढ्यात जाण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षारक्षकाने वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप हळद घेऊन आलेले वाहनचालक वैजनाथ पठाडे, गजानन शिंदे, कैलास विश्वनाथ सावळे, सुभाष सावळे यांनी केला. या प्रकारामुळे संतप्त शेतकरी व वाहनचालकांनी बाजार समितीचे गेट बंद करुन आंदोलन केले.
बाजार समितीचे संचालक महासेन प्रधान यांनी सकाळी ७ वाजता हिंगोली शहर पोलीस ठाण्यात संपर्क करुन पोलीस कर्मचारी पाठविण्याची मागणी केली मात्र ठाण्यात सकाळी एकच कर्मचारी हजर असल्याने बंदोबस्त मिळू शकला नाही. ठाण्यातील कर्तव्यावर हजर असलेल्या एका कर्मचाऱ्याने इतर कर्मचाऱ्याने फोन करुन ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर १० वाजेदरम्यान पोलीस मोंढ्यात दाखल झाले. पोलीस व बाजार समितीचे संचालक प्रधान यांनी शेतकरी व चालकांची समजूत काढल्यानंतर प्रकरण शांत झाले. त्यानंतर पोलिसांनी वाहनांना मध्ये सोडले.