हिंगोली : २0११ पासून डीपी मिळत नसल्याच्या कारणावरून औंढा तालुक्यातील पुरजळ येथील पाच शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या भागात महावितरणकडून २0११ मध्ये डीपी टाकण्यासाठी विद्युत खांब उभे करण्यात आले होते. मात्र त्यानंतर कंत्राटदाराने डीपी बसविण्यासह वीजवाहिनीचे कामच केले नाही. परिणामी, या शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न धुसरच आहे. या शेतकऱ्यांनी कोटेशन भरले असून शेतात विहिरी, बोअर घेतले आहेत. मात्र त्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याचे चित्र आहे.पुरजळ येथील गट क्र.४५ च्या या डीपीबाबत महावितरणला शेकडो निवेदने दिली. प्रत्यक्ष भेटी दिल्या. मात्र काहीच फरक पडला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी २६ नोव्हेंबर २0१८ रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता.
यावरून निवासी उपजिल्हाधिकारी के.ए.तडवी यांनी महावितरणला यात लक्ष घालून हा प्रश्न सोडविण्याचे पत्रही ३ डिसेंबरला दिले होते. मात्र यात काहीच झाले नसल्याने अखेर ७ रोजी साहेबराव जाधव, मिठू दाजिबा पवार, संजय मिठू पवार आदींनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. सोबत पेट्रोलही घेवून आले होते. हा प्रकार लक्षात आल्याने पोलिसांना पाचारण केले होते.
पोलीस आल्यानंतर घाईने साहेबराव जाधव यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले. ते म्हणाले, मागच्या अनेक वर्षांपासून आम्हाला न्याय मिळत नाही. पाणी असूनही पीक घेता येत नाही. यंदा दुष्काळामुळे घरातही खायला काही नाही. मुलबाळ दुषणे देवू लागली आहेत. त्यामुळे आता एकतर डीपी द्या नाहीतर आम्हाला कुटुंबियांसह मरू द्या. मरणाशिवाय पर्यायच नाही. उद्विग्नपणे या सर्वांनी जेलमध्येही टाकायचे तर सगळ्या कुटुंबालाच टाका, अशी भूमिका घेतली.
तर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना भेटू न दिल्यास व आम्हाला डीपी न मिळाल्यास भविष्यातही आम्ही असे आंदोलन करू, असा इशारा दिला. यावेळी फौजदार काशिद, वाबळे, माखणे, राठोड यांनी या सर्वांना पकडून शहर पोलीस ठाण्यात नेले. पुढील कारवाई सुरू आहे. या प्रकारानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मात्र हादरून गेले होते.
पाहा व्हिडीओ -