हिंगोली : जिल्ह्यात भाजपचे तान्हाजी मुटकुळे यांच्या रूपाने एकमेव आमदार असून, ते दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. त्यांनी मागच्या वेळी अनेक विकासकामे मार्गी लावल्याने यावेळी त्यांना लाल दिवा मिळावा, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.
हिंगोली जिल्ह्यात विधानसभेचे तीन, तर विधान परिषदेच्या एक सदस्या आहेत. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत, तर वसमतला राष्ट्रवादीचे राजू नवघरे आहेत. विधान परिषदेवर काँग्रेसच्या आ. प्रज्ञा सातव आहेत. हे तिन्ही आमदार विरोधी बाकावर बसणार आहेत. सत्ताधारी एकमेव आमदार म्हणून तान्हाजी मुटकुळे हेच आहेत. भाजपला जिल्ह्यावर तसेच लोकसभेवर पकड मजबूत करायची असेल, तर त्यांना मंत्रिपद दिल्यास फायदा होऊ शकतो.
मागच्या वेळी त्यांची पहिलीच टर्म असल्याने त्यांना संधी मिळाली नव्हती. मात्र, त्यांनी मंत्र्याला लाजवेल, अशा पद्धतीने कामे खेचून आणली होती. मात्र, यात त्यांना मतदारसंघापुरतेच काम करण्याची संधी मिळाली. पूर्ण जिल्हाभर काम करण्यासाठी, तसेच पक्षवाढीसाठी मंत्रिपदाचा लाल दिवा उपयोगी ठरू शकतो. शिवाय राज्यमंत्रिपद मिळाले तरीही पालकमंत्री म्हणून जिल्ह्यावर पकड मजबूत करण्याची संधी भाजपला मिळणार असल्याने त्यांना मंत्रिपद मिळावे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. स्वत: आ. मुटकुळे यांनाही तशी अपेक्षा असली तरीही पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडायची असते, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.