हिंगोली : जिल्हा रूग्णालयातील कारभार दिवसेंदिवस ढेपाळत चालला आहे. कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून होणारा त्रास शिवाय त्यांचे प्रलंबित विविध प्रश्न सोडविण्यात यावी याबाबत वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांनी ३ जून पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात मागील काही महिन्यांपासून विविध घटनां घडत आहेत. येथे उपचारासाठी येणाऱ्या सर्वसमान्य रूग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत, हा तर येथील मुख्य प्रश्न आहे. शिवाय येथे कार्यरत वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांचाही प्रश्न गंभीर बनला आहे. काही दिवसांपुर्वी बिले काढण्यासाठी तसेच इतर कार्यालयीन कामासाठी आस्थापना व लेखा विभागातील कार्यरत अधिकारी कर्मचारी वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना पैशांची मागणी करीत असल्याचा आरोप करीत असून एकाने तर चक्क आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले होते. तर एका कर्मचाऱ्यास त्याच्या सर्व्हिसबुकचे पान फाडल्यामुळे ह्यदयविकाराचा झटका आल्याने उपचारासाठी जिल्हा रूग्णालयातच दाखल करण्यात आले होते. या घटनेवरून जिल्हा रूग्णालयातील कारभार चव्हाट्यावर आला असून याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक हवी तशी दखल घेत नसल्याचेही दिसून येत आहे. यासह कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात यासाठी जिल्हा रूग्णालयातील जवळपास ४५ कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.
रूग्णसेवा सुरूचकामबंद आंदोलन कर्मचाऱ्यांकडून केले जात असले तरी, रूग्णसेवा मात्र सुरू आहे. केवळ स्वच्छतेची कामे व इतर कार्यालयीन कामे बंद ठेवण्यात आली आहेत. असे कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पांढरे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.
जिल्हा शल्य चिकित्सक म्हणतात...कामबंद आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांच्या मागणींचे काम अंतीम टप्यात आहे. चौकशीची कामे अंतीम टप्यात असून येत्या दोन दिवसांत अहवाल सादर केला जाईल. असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले.