हिंगोली : महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. याचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात २० मार्चपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात आशामार्फत घरोघरी जाऊन कर्करोगाची लक्षणे असलेल्या महिलांचे सर्वेक्षण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले.
येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवसंजीवनी अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, डॉ. नीलेश चांडक, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील देशमुख, डॉ. पांडुरंग फोपसे, डॉ. एस. शैलेजा कुप्पास्वामी आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, संजीवनी अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी आशांना प्रशिक्षण देऊन त्यांना प्रश्नावली कशी भरावी, याची माहिती द्यावी. प्रशिक्षणानंतर सर्व आशांनी घरोघरी जाऊन ३० वर्षांवरील महिलांचे सर्वेक्षण करावे. कर्करोगाची लक्षणे असलेल्या संशयित महिलांची व्हीआयए आणि सीबीई टेस्ट करावी. अशा रुग्णांची यादी तयार करावी. कर्करोगाचे निदान झालेल्या महिलांचे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेतून उपचार करण्यासाठी मदत करावी आदी सूचना त्यांनी केल्या.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. गजानन चव्हाण, डॉ. संदीप काळे, डॉ. डी.व्ही. सावंत, डॉ. गंगाधर काळे, डॉ. अरुणा दहीफळे, डॉ. सचिन राठोड, डॉ. कल्पना सुनतकरी, डॉ. बालाजी भाकरे, डॉ. फैजल खान, डॉ. प्रशांत पुठावार, श्रीपाद गारुडी, कुलदीप केळकर, सचिन करेवार, आनंद साळवे आदींची उपस्थिती होती.