हिंगोली जिल्ह्यात हिंगोली ५४.७० मिमी, कळमनुरी ५३.४० मिमी, वसमत ७० मिमी, औंढा ६५.५० मिमी, सेनगाव ३३.२० मिमी अशी तालुकानिहाय सरासरी पर्जन्याची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण सरासरीच्या ४३.८३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. हिंगोली ३९.५७ टक्के, कळमनुरी ४६.२७, वसमत ४०.७१, औंढा ५३.७२ तर सेनगावात ४०.८३ टक्के पर्जन्य झाले आहे. औंढा तालुक्यात वार्षिक सरासरीच्या पन्नास टक्क्यांपेक्षा पाऊस पहिल्या दीड महिन्यातच झाल्याचे दिसत आहे.
कालच्या पावसाने जिल्ह्यातील विविध भागात नदी, नाल्यांना पूर आला होता. अनेक ठिकाणी पिके खरडून गेली. नदी व नाल्याकाठच्या शेतीला फटका बसला. अनेकांच्या शेतातही पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे.
मंडलनिहाय असे झाले पर्जन्य
हिंगोली तालुक्यात हिंगोली ५३.५ मिमी, नर्सी ५१.८, सिरसम ३५.५, बासंबा ६२.५, डिग्रस कऱ्हाळे ७७.३, माळहिवरा ४१.५, खांबाळा ६०.५, कळमनुरी ४७.५, वाकोडी २७, नांदापूर ५७.८, आखाडा बाळापूर ५७.३, डोंगरकडा ६९.५, वारंगा फाटा ६१, वसमत ८२.५, आंबा ६९.३, हयातनगर ६५, हट्टा ७३, टेंभुर्णी ६०, कुरुंदा ७०.८, औंढा ६८, येहळेगाव सोळंके ६८.३, साळणा ५६.३, जवळा बाजार ७३.५, सेनगाव ४३.३, गोरेगाव ३६.५, आजेगाव ४१.३, साखरा २३.३, पानकनेरगाव ४१, हत्ता ३.५ मिमी अशी मंडलनिहाय पावसाची नोंद झाली आहे. दहा मंडलामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
समग्याचा पूल गेला वाहून
हिंगोली : येथून जवळच असलेल्या समगा येथील पूल पुन्हा पावसामुळे तुटल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे आलेल्या पुरामध्ये हे नुकसान झाले आहे.
कयाधू नदीवर असलेल्या या पुलावरून समगा गावात जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या पुलाची उंची अतिशय कमी आहे. नदीला मोठा पूर आला तर या पुलावरून पाणी वाहू लागते. त्यामुळे या गावांचा संपर्क तुटतो. मात्र मागील काही वर्षांपासून या नदीला पूर आला की पूल तुटत आहे. पुलाचा काही भाग वाहून गेल्याने ग्रामस्थांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. आता पहिल्याच मोठ्या पुरात हा पूल तुटल्यामुळे यापुढील पावसात उर्वरित पूलही वाहून जाणार असे दिसते. त्यामुळे या गावाला पुन्हा पुलासाठी संघर्ष करावा लागणार आहे. या पुलाची उंची वाढवून ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी होत आहे.
तिघांचा वाहून गेल्याने मृत्यू
या पावसाने तिघांचा बळी घेतला. वसमत तालुक्यातील अकोलीवरून वसमतकडे परतणारा नीलेश बच्छेवार हा तरुण काल सायंकाळी वाहून गेला. तर औंढा नागनाथ तालुक्यातील असोला येथील पुलावरून चारचाकी वाहून गेल्याने वर्षा पडोळ व श्रेयश पडोळ या मायलेकाचा मृत्यू झाला. यात रामदास शेळके व योगेश शेळके हे बचावले.
सकाळी भूकंप, सायंकाळी अतिवृष्टी
औंढा व वसमत तालुक्यातील जनतेला सकाळी भूकंपाच्या धक्क्यांनी हैराण केले, तर सायंकाळी मुसळधार पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी फटकाच बसला. काही काळातच जास्त पर्जन्य झाल्याने ढगफुटीचा अनुभव आला. यात शेतीचे नुकसान झाले.