हिंगोली : जिल्ह्यात वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे महसूल विभागाच्या वतीने पथके नेमून याविरुद्ध कारवाई झाली. मागील दोन महिन्यांत ३७ वाहन मालकाकडून ५३ लाख १८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर अजूनही तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ठाण्यात अनेक वाहने ताटकळत उभी केलेली आहेत.
अनेक वर्षांपासून जोमात असलेला वाळू वाहतुकीचा व्यवसाय दोन ते तीन महिन्यांपासून डबघाईला आला आहे. जराही वाहन रस्त्यावर दिसले की कधी पथक तर कधी अधिकारी त्या वाहनांचा पाठलाग करुन कारवाई करण्याचा सपाटा लावत आहेत. त्यामुळे अनेक वाहन धारकांनी व्यवसाय बदलले. तर काहींनी घरासमोर वाहने उभी केली आहेत. यातून शासनाला मुबलक प्रमाणात महसूल तर मिळालाच मात्र अनेकांवर उपासमार आली. हेही तेवढेच खरे ! पाठलाग करुन वाहने पकडल्याने वाहनधारकांसह चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर पथकाच्या भीतीपोटी जिकडे रस्ता मिळेल तिकडे वाहने सुसाट वेगाने पळविली जात होती. त्यात काहींचे किरकोळ अपघातही झाले. मात्र चोरीचा मामला अन्... असे चित्र होते. आजही हिंगोली जिल्ह्यात जराही कुठे वाळू घेऊन जाणारे वाहन दिसले की, काही क्षणात कारवाई केली जात आहे. त्यामुळे वाळू माफियामध्ये मात्र दहशद निर्माण झाली आहे.
तालुकानिहाय दंडवसुलीहिंगोली तालुक्यात २ वाहनांकडून ६ लाख ४४ हजार, सेनगाव ४ वाहनांकडून १० लाख ४३ हजार, उपविभाग हिंगोली ६ वाहनांकडून १६ लाख ८७ हजार, कळमनुरी तालुका ११ वाहनांकडून ७ लाख ६२ हजार रुपये, उपविभाग कळमनुरी ११ वाहनांकडून ७ लाख ६२ हजार, वसमत तालुका २ वाहनांकडून ५ लाख ६४ हजार, औंढा नागनाथ १८ वाहनांकडून २३ लाख ५ हजार, वसमत उपविभाग २० वाहनांकडून २८ लाख ६९ हजार अशा एकूण ३७ वाहनांकडून ५३ लाख १८ हजार रुपये दंड वसूल केला करण्यात आल्याची नोंद महसूल विभागाकडे आहे.
जिल्हाच हादरला महसूल विभागाच्या पथकाच्या धास्तीने संपूर्ण हिंगोली जिल्हाच हादरुन गेला आहे. तर अजूनही काही ठिकाणी काहीच फरक पडलेला दिसत नाही. रात्री-अपरात्री वाळूची वाहतूक सुरुच आहे.