हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वार्डात अपुरे मनुष्यबळ असल्याची ओरड सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रातील १२ डॉक्टरांची नियुक्ती येथे केली होती. मात्र त्यापैकी बहुतांश डॉक्टर एका भेटीनंतर पुन्हा फिरकलेच नाही.
हिंगोली जिल्ह्यात सध्या कोरोनाचा कहर कमी झाला आहे. मात्र तो अजून संपला नाही. मध्यंतरी जिल्ह्यात पाचशेच्या आसपास अॅक्टिव्ह रुग्णसंख्या पोहोचली होती. त्याचा परिणाम म्हणून उपलब्ध मनुष्यबळावरील ताण वाढला होता. त्यातच एवढे रुग्ण हाताळताना डॉक्टर व परिचारिकांची मोठी कसरत करावी लागत होती.
जिल्हा रुग्णालयात काही नवनियुक्त परिचारिकांसह ग्रामीण भागातील १२ डॉक्टर कोरोना वार्डात सेवेसाठी नियुक्त केले होते. मात्र ते एकदा कोरोना वार्डात येवून गेले की, पुन्हा परतलेच नाहीत. मध्यंतरी एक वयस्कर डॉक्टर तेवढे सेवा बजावत होते. मात्र इतर कुणाचे काही होत नसल्याचे लक्षात येताच त्यांनीही अंग काढून घेणे पसंत केले. त्यामुळे पुन्हा काही ठरावीक डॉक्टरांनाच अतिरिक्त ताण सोसावा लागत होता. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांना विचारले असता अनुपस्थितीबाबत आम्हाला कळविल्यास यावर निर्णय घेता येईल, असे त्यांनी सांगितले. ही बाब गंभीर असून यात निश्चितच योग्य ती कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.