हिंगोली : येथील तहसील परिसरात शेतीच्या वादातून तालुक्यातील सवड येथील शेतकऱ्याची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या झाल्याची आज दुपारी ३.४५ वाजता घडली. जखमी शेतकऱ्याने मदतीसाठी तहसीलमध्ये धाव घेतली, मात्र तरीही त्याचा जीव वाचला नाही. हा सर्व प्रकार कार्यलयातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
सीताराम नारायण राऊत (५०) असे मयताचे नाव आहे. राऊत यांच्या शेताचा मागील सात वर्षांपासून वाद सुरू आहे. तर हे प्रकरण न्यायालयातही सुरु असल्याचे मयताची पत्नी अक्रोश करुन सांगत होती. राऊत यांची नेहमीच हिंगोली येथे ये - जा सुरु होती. यापूर्वीही अनेकदा वाद व मारहाणही झाली होती. बुधवारी सकाळी हिंगोली येथे निघताना याच भीतीपोटी मयताची पत्नी मनकर्णाबाई याही सोबत आल्या होत्या. मनकर्णाबाई यांनाही त्यांनी यापूर्वी मारहाण करून जखमी केलेले होते. मात्र तरीही मला काहीही होणार नाही. घाबरु नकोस, असे म्हणून पतीने दिलासा देत सोबत आणल्याचेही मनकर्णाबाई यांनी सांगितले.
तहसील परिसरात झाला हल्लातहसील परिसरात दोघे बसले असता, हातात तीक्ष्ण हत्यार घेऊन त्यांच्याकडे एकजण धावत गेला व राऊत यांच्या मानेवर जोराने वार केला. राऊत जखमी अवस्थेतच ‘कोणी तरी वाचवा’ असे म्हणत तहसील कार्यालयात धावले आणि व्हरांंड्यातील खुर्चीवर पडले. मात्र रक्तस्त्राव जास्तच झाल्याने ते खुर्चीवरुन खाली कोसळले. त्यांना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोनि उदयसिंह चंदेल, जमादार शेख शकील, स. मुजीब, सुधीर ढेंबरे आदी दाखल झाले होते. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी रंगनाथ मोरे हा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्याची चौकशी सुरु आहे.