आखाडा बाळापूर (हिंगोली) : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कयाधू नदीला पूर आला आहे. यामुळे नदी काठच्या १४ गावांना याचा मोठा फटका बसला आहे.
दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे परिसरातील नदी, नाले , ओढे दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे कयाधू नदीला पूर आला आहे. पुराचा मोठा फटका नदीकाठच्या १४ गावांना बसला आहे. कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव, सालेगाव, चाफनाथ, शेवाळा, डोंगरगाव पूल ,सापळी, कसबे धावंडा ,कोंढुर, डिग्रस, चिखली, कान्हेगाव, पिंपरी, येगाव या परिसरामध्ये पुराच्या पाण्याने प्रचंड हैदोस माजवला आहे. या परिसरातील ४० टक्के शेतीमध्ये पाणी घुसले असून यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, आखाडा बाळापूर - हदगाव मार्गावरील शेवाळा नजीकच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा महामार्ग बंद झाला आहे. शेवाळा येथे पूरपरिस्थिती गंभीर आहे. येथे चौघेजण पुरात अडकले होते. त्यांची सुखरूप सुटका करून सर्वाना देवजना येथे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच बाळापुर ते बोल्डा रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्यामुळे तोही मार्ग बंद पडला आहे.
कवडी-येगाव रस्ता गेला वाहून कळमनुरी तालुक्यातील येगावं- कवडी या भागात कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले झाले आहे. येगाव ते कवडी या दोन गावांना जोडणारा पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधलेला रस्ता पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला. त्यामुळे दोन गावातील संपर्क तुटला आहे. तसेच दोन्ही गावांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून माती वाहून गेली आहे.
तहसीलदारांची पाहणी
महसूल प्रशासन या घटनेवर बारीक लक्ष ठेवून असून ठीक ठिकाणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी पाहणी केली असून नुकसानीचा अंदाज पूर ओसरल्यानंतर कळेल असेही त्यांनी सांगितले आहे