औंढा नागनाथ (हिंगोली ) : उकाड्याने हैराण झाल्याने कपाने पाणी अंगावर घेत असताना अंगणातील टाकीत पडून एक ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील माथा या गावी घडली. जिल्ह्यातील कुरुंदा या गावात गुरुवारी बादलीत बुडून चिमुकलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर ही दुसरी दुखद घटना समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील माथा येथील शेतकरी दत्तराव कुटे यांची गावाजवळच शेती आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान त्यांची पत्नी आणि ते शेतात कामानिमित्त गेले. यामुळे त्यांची ५ वर्षीय मुलगी सपना एकटीच घरी होती. दरम्यान उन्हात वाढ झाल्याने सपना उकाड्याने हैराण झाली. यावर उपाय म्हणून ती अंगणात अर्धवट अवस्थेत गाडलेल्या टाकीतील पाणी कपाने अंगावर घेत होती. टाकीत पाणी कमी असल्याने तिच्या हातास पाणी लागत नव्हते, यामुळे ती टाकीत झुकून पाणी काढत होती. या दरम्यान तिचा तोल जाऊन ती टाकीत पडली. ती सरळ डोक्यावर पाण्यात पडल्याने तिच्या नाकातोंडात पाणी गेले.
संध्याकाळी तिची आई घरी आली असता तिला सपना कुठे दिसत नव्हती. आजूबाजूला शोध घेतला असता अंगणातल्या टाकीतील पाण्यात बुडालेल्या अवस्थेत सपना आढळून आली. हे पाहताच तिच्या आईने एकच हंबरडा फोडला. तिला लागलीच औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
कुरुंद्याची घटना कोठारी येथील ग्रामपंचायतीचे सेवक विश्वनाथ नरवाडे हे वसमत शहरात मालेगाव मार्गावरील पेट्रोलपंपच्या बाजूला बंडू मगर यांच्याकडे भाड्याने राहतात. मगर हे नरवाडे यांचे पाहुणेच आहेत. नरवाडे यांची पत्नीही ग्रामपंचायतीत कंत्राटी आॅपरेटर आहे. कामानिमित्त वारंवार वसमतला यावे लागते, म्हणून ते तेथेच वास्तव्याला आले होते. शहराचा नवीन भाग असल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक मिळेल त्या भांड्यात पाणी साठवून ठेवतात. नरवाडे यांच्या घरीदेखील असेच भांड्यांमध्ये पाणी ठेवलेले होते.
धनश्री खेळत खेळत पाणी भरलेल्या बादलीजवळ गेली. काही वेळ तिने यातील पाण्यासोबत खेळलेदेखील. खेळत असतानाच ती या बादलीत पडली. डोके खाली आणि पाय वर झाले. नाका, तोंडात पाणी गेल्याने तिचा जागीच मृृत्यू झाला. घरचे इतर कामात गुंतलेले असल्याने व ती पाण्याशी खेळत असल्याचे समजून त्यांचे लक्ष गेले नाही. तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच पालकांनी हंबरडा फोडला. नंतर लगेच कोठारी गाव गाठले. या घटनेमुळे कोठारी गावावर शोककळा पसरली आहे. मयत चिमुकलीवर कोठारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.