हिंगोली तालुक्यात जानेवारी ते जुलै २०१९ या काळात १६ हजार २६७ क्विंटल गहू व तांदूळ जास्तीचा उचलून ऑफलाइन वाटपात अनियमिततेचा आरोप करण्यात आला होता. या धान्याची बाजारभावाप्रामाणे ४.६१ कोटी रुपये एवढी किंमत होते. याबाबत आधी जिल्हा पुरवठा विभागाकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविल्यानंतर त्यात त्रुटी काढण्यात आल्या. त्यामुळे हा अहवाल पुन्हा प्रलंबित पडला होता. त्यातील त्रुटी दूर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, त्यानंतरही पुन्हा यात काही फारसे समोर आले नाही. त्यानंतर मध्यंतरी पुन्हा या प्रकरणातील तक्रारींनी तोंड वर काढले होते. आता पुन्हा या प्रकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली. उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या या समितीत तब्बल १७ पथके आहेत. मात्र, ही पथके हिंगोली तहसीलच्या कर्मचाऱ्यांची आहेत. त्यात जुन्या तहसीलदारांच्या काळातील हे प्रकरण असले तरीही सध्याच्या तहसीलदारांचाही या समितीत समावेश आहे. यापेक्षा दुसऱ्या तालुक्यातील पथकांकडून समितीने तपासणी केली असती तर अधिक वस्तुनिष्ठ अहवाल समोर आला असता, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता पुन्हा त्याच तहसीलची चौकशी त्याच तहसीलचे कर्मचारी करीत असल्याबाबत ओरड सुरू असल्याची दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाकडून वेळकाढू धोरण राबवत नुसत्या चौकशांचा फार्स सुरू असल्याने सत्य परिस्थिती समोर येत नाही. कदाचित घोटाळा झाला असेल तर संबंधितांना शिक्षा होणे अपरिहार्य आहे. मात्र काही दोष नसेल तर त्यांना नाहकच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यात १६५ स्वस्त धान्य दुकानदारांनाही नेमका दोष कळत नसल्याने त्यांचाही जीव टांगणीला आहे. कदाचित यात अनियमितता झाली असेल तर ती एवढ्या दिवसांत तरी स्पष्टपणे समोर येणे अपेक्षित होते. मात्र, तसे काहीच अहवालातून म्हटले जात नसल्यानेच विभागीय आयुक्तांनीही फटकारल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण अशाच पद्धतीने हाताळले गेले तर कायम चर्चेचा विषय राहणार आहे. चौकशी कधी पूर्ण होणार? याच एका प्रश्नावर पुन्हा पुन्हा अडलेले दिसणार आहे. सेनगाव तालुक्यातही अशा प्रकरणात दोष स्पष्ट झाला, नावे निश्चित झाली. कारवाई झाली, वसुलीही झाली. मात्र, हिंगोली तालुक्याच्या प्रकरणात असे काहीच स्पष्टपणे समोर येत नसल्याने हा विषय मागील वर्षभरापासून चर्चेचा बनला आहे.
हिंगोलीतील धान्य घोटाळ्याच्या चौकशीचा फार्सच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:30 AM