हिंगोली : भारतीय आदिवासी पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत बोडखे यांच्यावरील दाखल करण्यात आलेल्या हद्दपारीच्या निषेधार्थ हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा आज काढण्यात आला.
मानवअधिकारासाठी लढणाऱ्या प्रशांत बोंडखे यांच्यावर जाणीवपूर्वक हद्दपारीचा आदेश काढण्यात आला. त्यामुळे हा निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. प्रशांत बोड्खे यांनी आदिवासी पँथर संघटनेच्या माध्यमातून बोडखे यांनी हिंगोली जिल्ह्यात गत दोन वर्षांपासून सामाजिक कार्य सुरू केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी आदिवासी वस्त्या वरील मूलभूत सुविधा, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, समशानभूमी, ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचार व जमिनीचे आंदोलन, गायरान जमिनीचा प्रश्न अवैध धंद्यावर एल्गार, आदिवासी विभागातील भ्रष्टाचार, आश्रम शाळातील दयनीय अवस्थेची विरोधात आंदोलने छेडली.
यासह असंख्य सामाजिक प्रश्नावर त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रशांत बोडखे यांच्यावर राजकीय लोकांच्या दबावातून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी यांनी प्रशांत बोडखे यांच्यावर तडीपारीची कारवाई केली. त्यांच्यावरील ही कारवाई रद्द करण्याच्या मागणीसाठी प्रसिद्ध व्याख्यात्या सुषमाताई अंधारे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.
मोर्चामध्ये मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते महिला युवक व लहान बालके सुद्धा सहभागी झाली होती. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शासकीय विश्रामगृह येथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गक्रम झाला व प्रशासनास निवेदन देण्यासाठी आंदोलक जिल्हा कचेरीसमोर मोठ्या संख्येने एकत्र जमले होते.