हिंगोली : शहरातील बावणखोली येथे सात वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना घडली. चिमुकलीवर अत्याचार करणारा आरोपी अटक असून सदर आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी बावणखोली येथील सर्व नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिले आहे.
बावणखोली येथील चिमुकलीवर अतिप्रसंगाची घटना घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात आरोपी मधुकर निवृत्ती वाठोरे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. परंतु पोलीस प्रशासनाने सदर घटनेचा गांभीर्याने तपास करण्याची यावेळी मागणी करण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित जमले होते. आरोपीस फाशीची शिक्षा न दिल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.