हिंगोली : जिल्ह्यात ६ जून पासून संततधार पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यामुळे शेतातील पिकांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीन पिवळे पडले असून त्याची वाढही खुंटली आहे. तर ज्वारी, कापूस, उडीद, मूग, हळद या पिकांचेही नुकसान झाले आहे.
दहा ते बारा दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नसल्याने पिकांना उन्हाचीही आवश्यकता असते. मात्र १० दिवसांपासून ऊन नसल्याने पिकांना पिवळेपण आले आहे. दररोजच पाऊस बरसत असल्याने काही ठिकाणी शेतात पाणी साचल्यामुळे तूर, सोयाबीन पिवळी पडून वाढ खुंटल्याचे चित्र आहे. पाणी साचलेल्या ठिकाणी कुठेकुठे जागीच थिजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे या संततधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. शेतामध्ये पाणी साचले आहे. त्यातच वन्यप्राणीही फिरत असल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. पावसाने काही दिवस उघडीप दिल्यास शेतीचे कामे करता येतील, अशी अशा शेतकरी बाळगून आहेत.
पावसामुळे आंतर मशागतीला ब्रेककळमनुरी शहर व परिसरात मागील आठ ते दहा दिवसांपासून पावसाची रिमरिप सुरूच आहे. आतापर्यंत तालुक्यात ४४६ मी.मी. पाऊस पडला आहे. दररोजच पाऊस पडत असल्याने शेतातील आंतरमशागतीला ब्रेक लागला आहे. जमिनीतून पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे सोयाबीन, ज्वारी, तुर, मुग, उडीद आदी पिके पिवळी पडत आहेत.
संततधार पावसामुळे पिके पाण्यात जवळा बाजार परिसरात गत दहा ते बारा दिवसांपासून सतत रिमझीम पाऊस तर अधूनमधून दमदार पाऊस होत असल्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली असून शेतातील पिकांना तलावाचे स्वरुप आले आहे.
पिके कुजून जाण्याच्या मार्गावर वसमत तालुक्यातील कौठा परिसरात संततधार पावसाचा आजचा तेरावा दिवस उजाडला असून या सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतातील सर्वच पिकांवर परिणाम झाला आहे. अतिपावसाने हळद, कापूस, सोयाबीन इ. पिकांना धोका निर्माण झाला आहे.
ओल्या दुष्काळाचे सावट सेनगाव तालुक्यातील कडोळी परिसरातील गारखेडा, तपोवन, भगवती, माझोड, गुगूळपिंपरी आदी गावांवर यंदा ओल्या दुष्काळाचे सावट आहे. अतिपावसामुळे या भागातील हळद, कापूस, ज्वारी, सोयाबीन, तुरीसह सर्वच पिकांचे नुकसान होत आहे. या भागात पावसाने दहा ते बारा दिवसांपासून आतापर्यंत उघडीप दिली नाही. दररोज पाऊस पडत आहे. यामुळे शेतात ज्या ठिकाणी पाणी साचते, अशा ठिकाणची पिके हातची गेली.