लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मराठा आरक्षण क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला हिंगोली शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथे पोलिसांची जीप जाळली. तर वसमत, हिंगोलीत दगडफेक झाली. सर्वच मार्गांवर रास्तारोको होता.हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र शाळा, महाविद्यालयांना आधीच सुटी दिली होती. जेथे शाळा सुरू होत्या, तेथे विद्यार्थ्यांची गोची झाली. हिंगोली शहरात बंदला प्रतिसाद मिळाला. हजारो कार्यकर्ते बंदचे आवाहन करीत फिरत होते. ज्या भागात प्रतिष्ठाने सुरू होती, अशा ठिकाणी दगडफेक झाली. तालुक्यात हिंगोली-नांदेड मार्गावरील खानापूर व सावरखेडा या दोन ठिकाणी रस्त्यावर टायर जाळले. तर सावरखेडा येथे रस्त्यावर बाभळीचे झाड तोडून टाकल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर खानापूरला पोलिसांची जीप जाळली. तिचा क्र. एमएच-३८-जी-१८४ असा आहे. आडगाव मुटकुळे येथेही कार्यकर्त्यांनी सकाळी ११ वाजेपासून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. शिवाय वसमत येथे सकाळी १० वाजता मोर्चा काढला. बंद यशस्वी करण्यासाठी काही ठिकाणी दगडफेक झाली. यात पोलीस उपाधीक्षकांनाही दगड लागला. तर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको केला. वसमत तालुक्यातील आसेगाव येथे बस बंद केल्या होत्या. तर कुरुंदा येथे बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. तर चोंढी रेल्वे स्टेशन येथेही मराठा कार्यकर्त्यांनी बंद यशस्वी केला. कळमनुरीसह तालुक्यात मोठी बाजारपेठ असलेल्या आखाडा बाळापूर, वारंगा फाटा येथेही दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदविला. आखाडा बाळापूर येथे मराठा आमदारांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा उपरोधिक उपक्रम कार्यकर्त्यांनी केला. तर कळमनुरीत मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. बाळापुरात रस्त्यावर ठिय्या मारल्याने दीड तास राष्ट्रीय महामार्ग बंद होता तर शेवाळा चौकात आरक्षण समर्थकांची सभा व भाषणे झाली. डोंगरकडा येथील कार्यकर्त्यांनी कडकडीत बंद पाळून काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण केली. नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील हिवरा फाटा येथे टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले.औंढा नागनाथ येथेह बंद पुकारला असून प्रशासनास निवेदन दिले. तर तालुक्यातील जवळाबाजार येथेही बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. सेनगाव येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला.आंदोलकांची माणुसकीसावरखेडा येथे रस्त्यावर झाडे टाकल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. यात रुग्णवाहिका अडकल्याने आंदोलकांनी पोलिसांच्या मदतीने रुग्णास आणले. तर पर्यायी व्यवस्था करून रुग्णाला जिल्हा रुग्णालयात पाठविले.हिंगोलीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंद पाळण्यात आला. तसेच गांधी चौक भागात कार्यकर्ते दिवसभर ठाण मांडून होते. शहरातील विविध भागात फिरून मराठा समाजाच्या युवकांनी घोषणाबाजी करीत दुकाने बंद करायला भाग पाडले. त्याचबरोबर शासकीय विश्रामगृह परिसरात व गांधी चौकात याआंदोलनाला पाठिंबा म्हणून नदीत उडी घेत जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर शहरातून मोटारसायकल रॅलीही काढली होती. शहरात शिवाजीनगर, रेल्वेस्थानक रोड, पेन्शनपुरा भागात दडगफेक झाली.गांधी चौक भागात आंदोलकांनी शासनाच्या विरोधात आक्रमक भाषणे केली. आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून याची तीव्रता अजूनही वाढेल, असा इशारा दिला आहे.
हिंगोलीत मराठा आरक्षण पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:24 AM