लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा रूग्णालय औषधी तुटवड्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मागील पंधरा दिवसांपासून जिल्हा रूग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. वातावरणातील बदलामुळे विविध आजार जडत आहेत, असे डॉक्टरांतून सांगितले जात आहे. मात्र जिल्हा रूग्णालयात येणा-या रूग्णांची तपासणी जरी होत असली तरी, औषधी उपलब्ध नाही, त्यामुळे रूग्णांना थेट बाहेरून औषधी विकत घ्यावी लागत आहे.हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात विविध आजारांच्या निम्म्या औषधी उपलब्ध नाहीत. रूग्णांच्या हातावर प्रत्येकांना केवळ चार गोळ्या देऊन सोपस्कार कार्यक्रम केला जात आहे. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांतून संताप व्यक्त केला जात आहे. बाहेरून औषधी आणण्यास सांगितले जात असल्याने गरीब रूग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांना औषधी तुटवड्याबाबत विचारले असता ते म्हणाले, दोन दिवसांत औषधीपुरवठा उपलब्ध होणार आहे. शिवाय अत्यावश्यक औषधीसंदर्भात संबंधित विभागाला त्या उपलब्ध करून घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. उपचारासाठी आलेल्या रूग्णांची तपासणी केली जात आहे. मात्र औषधी मात्र तुटवडा आहे, असेही त्यांनी सांगितले.औषधी पेढीत आलेल्या रूग्णांच्या हातावर केवळ चार गोळ्या थोपविल्या जात आहेत. ज्या औषधी उपलब्ध नाहीत, त्याच्यासमोर स्टार असे चिन्ह केले जात आहे. म्हणजेच ती औषधी उपलब्ध नसून रूग्णांनी बाहेरून खरेदी करायची आहे. मागील अनेक महिन्यांपासून रूग्णालयातील औषधी तुटवड्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे उपचारासाठी येणा-या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. खोकला, सर्दी, ताप, यासह विविध आजार जडत आहेत. त्यामुळे उपचारासाठी रांगा लागत असल्याचे चित्र आहे. औषधी विभागातील संबंधित अधिकाºयास विचारले असता ते म्हणाले, सध्या स्थानिक खरेदीवर आवश्यक औषध उपलब्ध करून घेत आहोत. औषधी टेंडरचे काम शेवटच्या टप्प्यात आहे, लवकरच औषधसाठा प्राप्त होईल, असे त्यांनी सांगितले.
पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीरजिल्हा रूग्णालयातील पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर आहे. पिण्याचे पाणी नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना जवळपास फिरून हॉटेलवरून पाणी आणावे लागते. मागील अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या कायम आहे. वारंवार पाईपलाईन फुटल्याने वेळेवर जोडणी केली जात नसल्याचे चित्र आहे. जवळच पाणपोईची सुविधा आहे. लोकसहभागातून ही पाणपोई सुरू असते. परंतु सध्या तीही बंद आहे. त्यामुळे रूग्णांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहेत. तर रूग्णांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.उपचारासाठी रूग्णालयात येताय ? सोबत पंखा घेऊन या !जिल्हा रूग्णालयातील निम्मे पंखे बंद आहेत, त्यामुळे रात्रीच्या वेळी डासांचा त्रास होतो. परंतु वार्डातील निम्मे पंखे बंद असल्यामुळे रूग्णाचे नातेवाई चक्क सोबतच पंखे घेऊन येत आहेत. त्यामुळे जिल्हा रूग्णालयाचा कारभार वा-यावरच सुरू असल्याचे दिसून येत आहे. शिवाय जिल्हा रूग्णायालत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, स्वच्छतागृह, परिसरात अस्वच्छता यासह विविध समस्यांचा सामना रूग्ण व सोबतच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक मात्र अजूनही रूग्णालयाला शिस्त लावण्याचा व नियोजनाचाच आराखडा तयार करीत आहेत, हे विशेष.