हिंगोली : कळमनुरी विधानसभेचे आमदार डॉ. संतोष टारफे यांची कार बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने पेटवून दिली. ही घटना शहरातील नाईकनगर भागात घडली. वेळीच आग विझविण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.मात्र यात कारचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, कळमनुरी विधानसभेचे आमदार डॉ. संतोष टारफे यांचे शहरातील नाईकनगर निवास्थान आहे. बुधवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरासमोरील कार पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती आमदार टारफे यांना दिली.
यानंतर आग विझविण्यात आली. आगीमुळे कारमधील आसनव्यवस्था व वातानुकूलित यंत्रणा जळाली आहे. कृत्य कोणी व का केले असावे या बाबत अद्याप उलगडा झाला नाही. मात्र, या परिसरात आमदार टारफे यांच्या घरासह इतर घरांमध्ये सीसीटीव्ही लावलेले आहेत त्यात हा सर्व प्रकार कैद झाला आहे. घटनास्थळी शहर ठाण्याचे पोनि उदयसिंग चंदेल व सहकाऱ्यांनी भेट दिली.
खोडसाळपणे केलेले कृत्य याबाबत आमदार टारफे यांनी हे कृत्य खोडसाळपणाने केले असावे, याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविणार असल्याची प्रतिक्रिया दिली.