शिरड शहापूर (हिंगोली) : हिंगोलीवरून नांदेडकडे जाणाऱ्या स्वीफ्ट डिझायर कारने रस्त्यावरून धावत असतानाच अचानक पेट घेतला. आसपासच्या लोकांनी आरडाओरड करून ही बाब चालकाच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे सर्वांचाच जीव बचावला
दि. ४ ऑक्टोबररोजी सायंकाळच्या सुमारास वाहनचालकासह थोराजी बापूराव चव्हाण, विजया थोराजी चव्हाण, प्रिया चव्हाण आणि दोन लहान मुले असे ६ जण या कारने हिंगोलीवरून नांदेडला चालले होते. यादरम्यान वाघी पाटीजवळून वाहन जात असताना त्याठिकाणी रस्त्यावर पडून असलेल्या सोयाबीनच्या भुश्यामुळे गरम झालेल्या वाहनाने खालून अचानक पेट घेतला.
रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य वाहनचालकांच्या व शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरडाओरड करून कारच्या चालकास वाहन थांबविण्यास सांगितले. त्यानेही तात्काळ वाहन थांबवून कारमधील सर्वांना खाली उतरविले. त्यानंतर काहीच क्षणात धगधगत्या आगीत कार जळून खाक झाली. बॅग, मोबाईल, वाहनाचे कागदपत्र आगीत भस्म झाले. हे दृष्य पाहून चव्हाण कुटूंबियाने हंबरडा फोडला. कुरूंदा पोलिस ठाण्याचे पोनि सुनील गोपीनवार यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी अग्निशमनचे वाहन घटनास्थळी पाठविले; मात्र तोपर्यंत वाहन जळून खाक झाले होते.