लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी मुनीर पटेल यांची फेरनिवड झाली असून कार्याध्यक्षपदी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांची निवड झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या जिल्हाध्यक्ष कोण? या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे.हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सलग तीन टर्म मुनीर पटेल हेच राहिल्याने यावेळी ते या पदासाठी आधी इच्छुक नव्हते. नंतर अंतर्गत घडामोडींमुळे त्यांनी पुन्हा अर्ज भरला होता. या पदाच्या स्पर्धेत त्यामुळे मुनीर पटेल व दिलीप चव्हाण यांची नावे चर्चेत आली होती. असे असले तरीही जि.प.तील गटनेते मनीष आखरे व सदस्य संजय कावरखे, जगजितराज खुराणा, बी.डी. बांगर यांनीही अर्ज भरले होते. त्यामुळे या पदासाठी निवडणुकीद्वारे मतदान झाले होते. त्यात पटेल किंवा चव्हाण यांचीच वर्णी लागणार हे निश्चित होते. मात्र ही निवड जाहीर केली नसल्याने मागील तीन महिन्यांपासून इच्छुकांचा जीव टांगणीला लागला होता. कोणाची निवड होणार याबाबत कार्यकर्तेही वारंवार विचारणा करीत होते. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर व आ.रामराव वडकुते यांच्या शिफारसीला महत्त्व असल्याचे सांगितले जात होते. मात्र एकवेळ तर कार्यकर्त्यांनी गट-तट मिटणार नसतील तर दांडेगावकरांनाच जिल्हाध्यक्ष करण्याची भूमिका मांडली होती. परंतु पक्षश्रेष्ठींनी निवडणूक प्रक्रिया राबवून अर्धे इच्छुक गारद केले होते. आता जिल्हाध्यक्षपदी पटेल व कार्याध्यक्ष दिलीप चव्हाण यांना करून यशस्वी खेळी खेळली.अनुभवी पटेल यांच्या जोडीला चव्हाण यांच्या रुपाने नव्या दमाचा खेळाडू दिला आहे. चव्हाण यांनी यापूर्वीही स्व.विलास गुंडेवार हे जिल्हाध्यक्ष असताना कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे. निवडीनंतर चव्हाण यांचा राकाँ शहराध्यक्ष जावेदराज यांच्यासह कार्यकर्त्यांनी सत्कार केला.
हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी पटेल, कार्याध्यक्ष चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 11:58 PM