लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नगरपालिकेतील विविध समित्यांच्या सदस्यांची निवड केल्यानंतर त्याच दिवशी सभापतींची निवड न झाल्याने निर्माण झालेला संभ्रम आता २६ फेब्रुवारी रोजी ठेवलेल्या सभेमुळे दूर होणार आहे.हिंगोली पालिकेत ६ फेब्रुवारी रोजी विविध विषय समित्यांसह स्थायी समितीच्या निवडीसाठी सभा आयोजित केली होती. स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे नगराध्यक्ष असतात. तर उपाध्यक्षांना नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष बनविण्याचा ठराव झाला होता. उर्वरित समित्यांची सदस्यसंख्या ८ ही निश्चित करून सभापती निवडीची प्रक्रियाही होणे अपेक्षित होते, असे सदस्यांचे म्हणने होते. मात्र सात दिवसांच्या आत सभापती निवडीची सभा होणार असल्याचे संकेत देत प्रशासनाने झाली तेवढीच प्रक्रिया अंतिम केली होती. त्यानंतर सुट्या व प्रशासनिक कारणाने सभापती निवडीची तारीखच निश्चित केली जात नव्हती. त्यामुळे आपोआपच नियोजन वगळता इतर सर्व समित्यांचे सभापती म्हणून नगराध्यक्षांनाच काम पहावे लागले असते. या बाबीमुळे काही सदस्यांनी सभापती निवड ही राजकीय दबावातून होत नसल्याची ओरडही सुरू केली होती. शिवाय शासन नियमाबाबतही संभ्रमावस्था होती. त्यामुळे यात वेगळीच खेळी खेळली जात असल्याचा आरोपही होत होता.याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच प्रशासनाने २६ फेब्रुवारी रोजी सभापती निवडीची सभा घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तसे पत्रही काढण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी सांगितले.दरम्यान, २८ फेब्रुवारीला न.प.ची अर्थसंकल्पीय सभा होणार आहे. तत्पूर्वीच ही निवड करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न दिसून येत आहे.
हिंगोली न.प. त २६ रोजी होणार सभापती निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:24 AM