हिंगोली : कोरोना महामारी, तसेच डेल्टा प्लस या आजाराचे वाढते रुग्ण पाहून परभणी जिल्हा प्रशासनाने हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांची एस. टी. सेवा बंद राहणार असल्याची माहिती हिंगोलीच्या एस. टी. आगाराने दिली.
कोरोना महामारी व डेल्टा प्लस हा आजार लक्षात घेऊन परभणी जिल्ह्यातील एकही बस हिंगोली जिल्ह्यात येणार नाही व हिंगोलीतून परभणीला जाणार नाही. हा आदेश २८ जून ते ३ जुलैपर्यंत राहणार असल्याचेही स्थानकप्रमुख संजयकुमार पुंडगे यांनी सांगितले. दुसरीकडे कोरोना महामारी ओसरत चालल्याचे पाहून बसने विनामास्क प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, चालक-वाहकही बिनधास्त दिसून येत आहेत. ‘मास्क असेल तर प्रवाशांना बसमध्ये प्रवेश’ या सूचनांचे पालन होताना पहायला मिळत नाही.
गत दीड वर्षापासून कोरोना महामारीने कहर केला आहे. कोरोना महामारी ओसरत चालल्याचे पाहून शासनाच्या परवानगीने एस. टी. महामंडळाने ६ जून २०२१ पासून कोरोना नियमांचे पालन करत प्रवाशांसाठी लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू केल्या आहेत. यात मुंबई, हैदराबाद, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, लातूर, नाशिक, परभणी, अकोला, अमरावती, नाशिक, औरंगाबाद आदी लांब पल्ल्याच्या बसेसचा समावेश आहे. प्रवासादरम्यान चालक-वाहकाने मास्क घालून प्रवाशांनाही मास्क असेल तर बसमध्ये प्रवेश द्यावा, अशा सूचनाही दिल्या आहेत; परंतु सद्य:स्थितीत चालक-वाहक सूचनांचे पालन करताना दिसून येत नाहीत. प्रवासादरम्यान, बाजारात जातेवेळेस नागरिकांनी मास्क घालूनच बाहेर पडावे, अशा सूचना जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने वारंवार देण्यात येत आहेत; परंतु या सूचनांकडे कोणाचेही लक्ष राहिले नाही, असे पहायला मिळत आहे.
एस. टी. चालक आणि वाहकांनी कोरोना महामारीचे नियम पाळले नाही तर त्यांना नियमाप्रमाणे दंड लावून त्यांच्यावर कार्यालयीन कार्यवाही केली जाईल. बसमध्ये प्रवासी चढतेवेळेस त्याला मास्क घालण्यास भाग पाडावे तरच बसेसमध्ये घ्यावे नसता बसमधून उतरावे, अशी सूचनाही चालक-वाहकांना महामंडळाने केली आहे.
फोटो ६