हिंगोली : येथील राज्य राखीव दलाच्या पोलीस भरती घोटाळ्याचे बिंग फुटल्याने याप्रकरणी ३ अधिकारी- कर्मचारी, ३ एसएसजी सॉफ्टवेअर कंपनीचे आॅपरेटर तसेच २० उमेदवारांविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील २० उमेदवारांच्या निलंबनाचे आदेश समादेशक योगेशकुमार यांनी १२ मे रोजी काढले.
हिंगोली येथील राज्य राखीव दलातील भरती घोटाळ्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. २०१३, २०१४ व २०१७ या कालावधीत घेण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रीयेत २० उमेदवारांना निकष डावलून सेवेत समाविष्ट करून घेण्यात आले. आता नांदेडनंतर हिंगोली येथील पोलीस भरतीत घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने एकच चर्चा होत आहे. हिंगोलीचे समादेशक योगेशकुमार व सहायक समादेशक तडवी यांनी राज्य राखीव दलातील पोलीस भरती घोटाळ्याची चौकशी केली. पोनि पुरभाजी मोरे यांच्या फिर्यादीवरून सेवानिवृत्त समादेशक जयराम लोढाजी फुफाटे, चालक नामदेव बाबूराव ढाकणे, एसएसजीचा आॅपरेटर शिरीष बापूसाहेब अवधूत, स्वप्नील दिलीप साळुंके, पोलीस कर्मचारी शेख महेबूब शेख आगा व २0 उमेदवारांविरूद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
१२ मे रोजी पोलीस भरती घोटाळ्यातील २० उमेदवारांचे निलंबनाचे आदेश काढणत आल्याचे समादेशक योगेशकुमार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. यामध्ये गोविंद बाबूराव ढाकणे, नीलेश बाबूराव अंभोरे, सुरेश विश्वनाथ चव्हाण, युसूफ फकीर शेख, मुनाफ फकीर शेख, संदीप केशव जुंबडे, उद्धव शिवराम धोतरे, अमोल विनोद जावळे, हरिभाऊ लक्ष्मण दुभाळकर, विश्वनाथ सदाशीव दळवे, सतीश विलासराव अंभोरे, सुभाष दशरथ रिठाड, किशन रामभाऊ शिंदे, गोरखनाथ धोंडुजी कोकाटे, अमोल विठ्ठल मांदळे, भगवान सुखदेव भोरुडे, बाळकृष्ण नामदेव वाघमारे, महादेव रामचंद्र पोवार, विठ्ठल संतोष खरात, विकास फुलचंद डोळे आदींचा समावेश आहे. भरती घोटाळ्यातील आरोपींच्या शोधासाठी पोलीस प्रशासनाकडून पथक स्थापन करण्यात आले आहे.