लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना गोवर रुबेला लसीकरण दिनांक २७ नोव्हेंबरपासून करण्यात येणार या करीता आरोग्य विभागातर्फे प्रत्येक विभागनिहाय कार्यशाळा, यात्रोत्सव, मेळाव्याद्वारे जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांनी सांगितले.डॉ. शिवाजी पवार म्हणाले की, २७ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील एकूण ३ लाख १४ हजार ६५५ बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे. प्रामुख्याने मुलींमध्ये रुबेला या आजाराचा प्रादुर्भाव शक्यता जास्त जाणवते. गोवरमुळे ताप येणे, सर्दी, वारंवार खोकला, पुरळ येणे इत्यादी लक्षणे आढळतात. किशोरवयीन मुलींना रुबेला आजार झाल्यास भविष्यात प्रकृतीचे प्रश्न निर्माण होण्याचा धोका असतो. तसेच लग्नानंतर काही मुलींना गरोदरपणात गर्भातील बालकांमध्ये काही व्यंग किंवा शारीरिक धोक्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्ह्यात सर्व ठिकाणी शहर व ग्रामीण भागात व्यापक स्वरुपात गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.सदर मोहिम शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. शिवाजी पवार यांनी दिली. ग्रामीण भागातील खाजगी माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा, इंग्लिश स्कूल आदी शाळांनी मोहिमेत सहभागी होण्यासासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच संबधित विभागाच्या यंत्रणेला वरिष्ठ स्तरावरून सूचनाही देण्यात आल्या आहेत.हिंगोली येथील दसरा महोत्सवात पॉम्पलेट, पोस्टर्स लावून, आॅडिओक्लीप, तसेच दर्शनिय भागात चौकात स्थानक परिसरात तसेच शासकीय र्कालयात परिसरात होर्डिंग लावण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत प्रभातफेरी, पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन व कीर्तनाच्या माध्यमातून तसेच शाळेत रांगोळी व विविध स्पर्धा, पालक मेळाव्यातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमध्ये गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
लसीकरणासाठी जिल्ह्यात हिंगोली जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 11:54 PM