जवळा बाजार ( जि. हिंगोली ) : हिंगोली-परभणी मुख्य रस्त्यावरील आडगाव रंजे परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्यास व त्यांच्यासोबत असलेल्या दोन साथीदारांना पिस्टलचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. २ ) रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी आज सकाळी पावणेचार वाजेच्या सुमारास लुटारूविरूद्ध विविध कलमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, दिनाराम दर्गाराम चौधरी रा. परभणी हे औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथील दुकानदारांकडून किरकोळ वसूली करून दुचाकीने केवाराम चौधरी व अनिस युनूस पठाण या दोन साथीदारांसह पभरणीकडे जात होते. परंतु अचानक काही चोरट्यांनी दिनाराम चौधरी यांची दुचाकी हिंगोली-पभरणी रस्त्यावरील आडगाव रंजे परिसरात अडविली. यावेळी चोरट्यांनी दिनाराम चौधरी व त्यांच्या साथीदारांना मारहाण करत पिस्टलचा धाक दाखवून अडीच लाखांची रोकड पळविली. काही क्षणातच चोरटे घटनास्थळावरून पसार झाले.
सायंकाळचे सहा वाजल्याने येथील परिसरात शुकशुकाट होता. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधत तिघांना लुटून रोकड लंपास केली. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये फिर्यादी दिनाराम चौधरी व त्यांच्या सोबत असलेले अनिस युनूस पठाण हे जखमी झाले असून या दोघांवर परभणी येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ३ डिसेंबर रोजी सकाळी ३.४५ वाजेच्या सुमारास वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि डी. टी. मुलगीर हे करीत आहेत.
ठाण्यातील दुरध्वनी क्रमांक बंद वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्यातील नागरिकांच्या सेवेसाठी असणारा टेलिफोन व मोबाईल क्रमांक मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे एखादी घटना घडल्यास पोलिसांशी थेट संपर्क होत नाही. शिवाय संबधित बिट जमादारही वेळेत घटनास्थळी पोहचत नाहीत. ही बाब गंभीर असून ठाण्यातील दुरध्वनी सेवा सुरू करण्याची मागणीही ग्रामस्थांतून होत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.