हिंगोली : आरटीई २५ टक्के आरक्षित जागेसाठी १३ मार्च रोजी सर्व शिक्षा अभियान कार्यालयात आॅनलाईन सोडतद्वारे १ कि.मी. अंतरावरील शाळेची पहिली फेरी पार पडली. त्यात २४५ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला. या विद्यार्थ्यांना १४ ते २४ मार्च दरम्यान, प्रवेश घेणे बंधनकारक होते. मात्र पालकांच्या विनंतीनुसार शिक्षण उपसंचालकांनी या तारखेत बदल केला असून ४ एप्रिलपर्यंत प्रवेश घेण्यास मुदतवाढ दिली आहे.
मोफत शिक्षक हक्क कायद्याअंतर्गत आरटीई २५ टक्के आरक्षित प्रवेशासाठी एकूण १ हजार १३१ विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. पुढील प्रवेश प्रक्रियेकरिता आॅनलाईन सोडत (लॉटरी) काढण्यात आली. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली, त्यांच्या पालकांनी १४ ते २३ मार्चपर्यंत संबधित शाळेत मूळ कागदपत्रांची पूर्तता करून प्रवेश निश्चित करणे आवश्यक केले होते. तर शाळांनी २६ मार्चपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेण्याच्या सूचनाही होत्या. परंतु प्रवेश घेताना आॅनलाईन प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे अनेकांचे प्रवेश निश्चित राहिले होते. त्यामुळे पालकांनी सदर तारखेत बदल करून ती वाढवून देण्याची विनंती केली. त्यामुळे शिक्षण संचालक यांनी ही अडचण लक्षात घेत शिवाय जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांना आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशासाठी मुदतवाढीचा निर्णय घेतला असून संबधित जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकार्यांना तशा सूचनाही दिल्या आहेत. प्रथम प्रवेश प्रक्रिया पूर्ण होताच पुढील राऊंड होणार आहे.
पहिल्या सोडतमध्ये २४५ विद्यार्थीआरटीई २५ टक्के आरक्षित ६९२ जागेत विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. एकूण १०१३१ जणांनी आरटीई २५ टक्केसाठी आॅनलाईन अर्ज सादर केले आहेत. १३ मार्च रोजी १ कि. मी. अंतरावरील ‘शाळा’ प्रवेशाची प्रक्रिया पार पडली. या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होताच दुसरी आॅनलाईन फेरी होणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. यानंतर ३ कि. मी. तसेच त्यापेक्षा जास्त अंतरावरील शाळा प्रवेश प्रक्रिया होणार आहे.
प्रवेश नाकारलाजिल्ह्यात आरटीई अंतर्गत एकूण ५९ शाळांचा समावेश असून यातील हिंगोली शहरातील दोन शाळांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशास नकार दिला. याबाबत शिक्षण विभागाने वरिष्ठ अधिकार्यांना पत्रही पाठविले आहे.