जवळा बाजार ( हिंगोली ) : जवळाबाजार येथील सात दुकानात चोरट्यांनी एकाच रात्रीत चोरी केल्याची रविवारी मध्यरात्री घडली. चोरटे चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून पोलिसांनी विविध पथकांच्या सहाय्याने तपास सुरु केला आहे. घटनास्थळी एक विना क्रमांकाची मोटारसायकल आढळली असून ती पोलिसांनी जप्त केली आहे.
जवळा बाजार येथील मुख्य रस्त्यावरील रविवारी रात्री दोन-अडीचच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत सात दुकाने फोडली आहेत. मुख्य रस्त्यावरील लक्ष्मण डफडे यांचे किराणा दुकान, गजानन स्टेशनरी, श्रावणी ड्रेसेस, शिवशाही कलेक्शन, राधीका जनरल स्टोअर्स, डॉ. चव्हाण मेडिकल तसेच परभणी हिंगोली रस्त्यावरील संदीप बिअरबार या ठिकाणी चोरट्यांनी शेटर उचकटून धुमाकूळ घालत मोठा ऐवज लंपास केला. याबाबतची माहिती पोलिसांना दिली असताना काही दुकानांमध्ये सीसीटीव्ही असल्यामुळे फुटेजमध्ये दोन ते तीन चोरटे चोरी करीत असताना आढळून आले आहेत.
जवळा बाजार पोलीसचौकीत पाच कर्मचारी असून अपुरे मनुष्यबळ आहे. तसेच रात्रीची गस्त बंद असल्यामुळेच चोरट्यांनी मुख्य रस्त्यावर चोरी करण्याचे धाडस केल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे. येथे नेहमीच चोरीचे प्रकार घडत असून एकाच वेळी सात दुकाने फोडल्यामुळे व्यापारी भयभित झाले आहेत. या घटनेची तक्रार देण्याचे काम सुरू असून उशिरापर्यंत घटनेत किती मुद्देमाल चोरी झाला हे समजु शकले नाही. काळाबाजार पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.